सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भात राज्य सरकारची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. विघातक प्रवृत्ती रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनाला ज्या दहशतवादी संघटनेनेेने फंडिंग केले त्याच संघटनेने मुंबईतल्या आंदोलनालाही फंडिंग केले असा गौप्यस्फोट भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पॉप्युलर फ्रंट इंडिया या दहशतावादी संघटनेने काँग्रेस नेत्याच्या खात्यावर जमा केला आहे असाही आरोप दरेकर यांनी केला.

“राज्यात CAA, NRC आणि NPR या विषयांवरून काही विघातक प्रवृत्ती रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. शाहीनबागसारखे आंदोलन मुंबईत करण्याचा या विघातक प्रवृत्तींचा डाव आहे असाही आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.  मुख्यमंत्री सी.ए.ए. च समर्थन करीत आहेत, पण या विषयासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे, त्यामुळे आता राज्यातील कोटयवधी जनतेला या विषयावरुन सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया  या अतिशय जहाल दहशतवादी मुस्लिम संघटनेने दिल्ली येथील शाहीनबाग आंदोलनाला फंडींग केले. फेसबुक पेजवर या संघटनेचे अस्तित्त्व आहे. ही संघटना स्वत:ला मुस्लिमांचे न्याय हक्क स्वातंत्र्य व संरक्षणाकरिता स्थापन झाल्याचा दावा करीत आहे, मात्र ही एक दहशतवादी संघटना आहे असंही प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

शाहीनबाग आंदोलनाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने निधी पुरविल्याची माहिती ईडीला मिळाली आहे, त्याचप्रमाणे १.४ कोटी रुपये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित विविध खात्यात जमा करण्यात आले आहेत. याचा उल्लेख एन.आय.ए. या केंद्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये नमुद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे नेते आणि संस्था यांच्या नावावर कोटयवधी रुपये जमा करण्यात आले आहेत. हा पैसा रोख स्वरुपात तसेच आरटीजीएस, एनईएफटी मार्फत जमा करण्यात  आल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

कॉग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या खात्यावर ७७ लाख, इंदिरा जयसिंग यांच्या खात्यावर ४० लाख, दृष्यंत ए. दवे यांच्या खात्यावर ११ लाख, अब्दुल समद यांच्या खात्यावर ३.१० लाख, न्यु जोठी मार्केटींग कॉर्पोरेशन आणि न्यु जोठी जनरल प्लास्टिक इंडस्ट्रीज यांच्या नावावर १.१७ कोटी व पीएफआई कश्मीर यांच्या नावावर १.६५ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आल्याचेही दरेकर यांनी सांगितले.