जंगलापासून दूरवरच्या वस्तीतील घुसखोरीने घबराट; वनविभागाकडून रात्री गस्त

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरापासून लांब असलेल्या अंधेरीतील शेर-ए-पंजाब वसाहतीत रविवारी बिबटय़ाने केलेल्या घुसखोरीने संपूर्ण अंधेरी उपनगरात खळबळ उडाली आहे. या भागात बिबट्या दिसल्याची ही पहिलीच घटना असल्याने इतक्या लांब बिबट्या कसा आला, यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर बिबट्या भक्ष्याच्या शोधात पुन्हा या भागात फिरकण्याची भीती असल्याने वनविभागाने या परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बिबट्याने रविवारी ज्या शाळेत आश्रय घेतला होता, ती शाळा काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला आहे.

बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीला लागून असलेल्या गोरेगाव बिंबीसार नगर वसाहत, मुलुंड, पवई, ठाणे या भागात राहणाऱ्या रहिवाशांना बिबट्याचे दर्शन वरचेवर घडते. बिबट्या दिसल्यानंतर येथील रहिवाशी तातडीने वन विभागाशी संपर्क साधतात. मात्र, अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब वसाहतीत रविवारी पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन घडले. हा बिबट्या ‘ज्युनिअर क्राफ्टिंग’ या लहान मुलांच्या शाळेत लपला होता. राष्ट्रीय उद्यानाच्या बचाव पथकाने रविवारी सायंकाळी तब्बल १३ तासांनंतर बिबट्याला बाहेर काढले. मात्र, अंधेरीवासीयांच्या मनातून बिबट्याची भीती गेलेली नाही.

शेर-ए-पंजाब गुरु द्वाराच्या भिंतीवर स्थानिक रहिवाशांनी रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास या बिबट्याला पाहिले होते. त्यानंतर बिबट्या जवळच असलेल्या निलगिरी इमारतीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या जॉर्ज आणि मेरी यांच्या घरामागील अंगणात शिरला. रविवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास जॉर्ज घरामागील अंगणात नाताळच्या सजावटीचे काम करत होते. ‘काम करत असताना माझे लक्ष समोरील भिंतीचा आडोसा घेऊन पाहणाऱ्या डोळ्यांवर गेले. मांजर असल्याचा समज होऊन त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याक्षणी बिबट्याने ताडपत्रीवर उडी मारून अंगणात प्रवेश केला,’ असे जॉर्ज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

येथून बिबट्या ‘ज्युनिअर क्राफ्टिंग’ शाळेत शिरला. या शाळेत शिशुवर्ग आणि पाळणाघर आहे. येथे सुमारे १०० मुले सकाळी ८.३० वाजल्यापासून येत असतात. रविवारी शाळेला आणि पाळणाघराला सुट्टी असल्याने शाळेत कोणीही नव्हते. मात्र, रविवारच्या घटनेनंतर पालकांत धास्ती असल्याने पुढील दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे या शाळेच्या प्रमुख रुची सबरवाल या म्हणाल्या.

अंधेरी, मरोळ,गोरेगाव या आरे वसाहतीला लागून असलेल्या भागांमध्ये रात्रीच्या वेळी नियमित गस्त घातली जात आहे. मात्र रविवारी घडलेल्या प्रकारानंतर या भागात गस्तीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. तसेच प्रसंग घडलेल्या वसाहतीमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून येत्या काही दिवसांमध्ये जनजागृती अभियान घेण्यात येणार आहेत.

– संतोष कंक, मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी.