News Flash

सिमी, इंडियन मुजाहिदीनची कुंडली कुरेशी मांडणार?

दहशतवादविरोधी यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनुसार तौकिर सिमीच्या पहिल्या फळीत सक्रिय होता.

तब्बल २२ वष्रे देशभरातील यत्रणांना गुंगारा देणारा अब्दुल सुभान कुरेशी उर्फ तौकीर याची अटक दहशतवादविरोधी लढय़ातील मोठे यश मानले जात आहे. तौकिर सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांची कुंडली मांडू शकेल. यातून दोन्ही संघटनांचे प्रमुख अतिरेकी, त्यांची सद्यस्थिती, केलेल्या प्रत्येक दहशतवादी कारवाईचे इत्थंभूत तपशील, देशभर पसरलेले स्लीपर सेल, पाठीराखे, सहानुभूतीतून दहशतवाद्यांना सर्वतोपरी सहकार्य केलेल्या व्यक्तींची माहिती तौकिरच्या चौकशीतून तपासयंत्रणांसमोर उघड होणार आहे.

दहशतवादविरोधी यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनुसार तौकिर सिमीच्या पहिल्या फळीत सक्रिय होता. सफदर नागोरीच्या अटकेनंतर सिमीचे सर्वोच्च पद तौकिरकडे आले. बंदीनंतर सिमीतील जहाल विचारांच्या तरुणांना एकत्र करून तौकिरने देशभर दहशतवादी कारवायांसाठीची प्रशिक्षण शिबिरे भरवली. तसेच इंडियन मुजाहिदीन नावाने दहशतवादी संघटना उभारण्यात पुढाकार घेतला. २००६मधील मुंबईतील लोकल गाडीत घडलेले स्फोट, २००८मध्ये अहमदाबादेतील बॉम्बस्फोट मालिकेसह इंडियन मुजाहिदीनने केलेल्या प्रत्येक दहशतवादी कारवाईत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या तौकिरचा सहभाग आहे. मधल्या काळात देशभरातल्या पोलीस यंत्रणांनी अटकसत्र आरंभून मुजाहिद्दीन संघटनेचे कंबरडे मोडले. त्यानंतर तोकिरच्या विखुरलेल्या संघटनेला नवी उभारी देण्याच्या खटपटी सुरू केल्या होत्या. तरुणांची माथी भडकावून त्यांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करून घेणे, या तरुणांना प्रशिक्षण, आर्थिक मदत, शस्त्र-स्फोटकांचा पुरवठा, निवारा, आदेश किंवा सूचना देण्यात तौकिरचा हतखंडा होता. एका अधिकाऱ्यानुसार एखाद्या कारवाईआधी जिहादी विचारांच्या तरुणांना तौकिर एकदाच भेटे. तो कुठून येई, कुठे जाई, कसा संपर्क साधे याबाबत इंडियन मुजाहिदीनचे संस्थापक म्हणवणाऱ्या भटकळ बंधूंनाही पत्ता नसे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार सिमी, इंडियन मुजाहिदीनच्या प्रत्येक कारवाई, प्रत्येक ज्ञात-अज्ञात अतिरेक्याची माहिती तौकिरच्या चौकशीतून निश्चितपणे पुढे येऊ शकेल. आयसीसमध्ये सहभागी झालेल्या साथीदारांची माहिती तो देऊ शकेल. विशेष म्हणजे गेल्या दोनेक वर्षांमध्ये नेपाळमधील वास्तव्य, सौदी अरबमध्ये आर्थिक मदतीसाठी केलेल्या वाऱ्या आदी महत्वपूर्ण माहिती दिल्ली स्पेशल सेलसह गुप्तचर यंत्रणांना मिळू शकेल.

राज्यात चार गुन्हे

महाराष्ट्रात तौकिरविरोधात एकूण चार गुन्हे आहेत. त्यापैकी दोन गुन्हयांचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे आहे. उज्जन आणि पुण्यात सिमी, इंडियन मुजाहिदीनच्या प्रमुख अतिरेक्यांसोबत बैठका घेऊन भविष्यातील दहशतवादी कारवायांची व्यूहरचना आखल्याबद्दल तौकिरविरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पायधुनी आणि कुर्ला पोलीस ठाण्यातील गुन्हे सिमीच्या बंदी आधी व नंतरचे आहेत. बाबरी मशिद प्रकरणाचा निषेध करणारी जहाल भित्तीचित्रांचा प्रसार आणि संघटनेवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ आंदोलन असे या गुन्हयांचे स्वरूप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 4:02 am

Web Title: terrorist abdul subhan qureshi arrested indian mujahideen simi
Next Stories
1 श्रमिक, हमालांची ‘स्पर्धा’ परीक्षा!
2 तोटय़ातील मोनो आगीमुळे फुफाटय़ात!
3 २१४ सरकते जिने, ३१८ एटीव्हीएम, १७ लिफ्ट
Just Now!
X