येत्या आठवडाभरात मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याचे भारतीय गुप्तचर खात्याकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर गुप्तचर खात्याने राज्यातील पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा दिवस, ठिकाणे आणि संघटनेच्या हस्तकांच्या नावांचा तपशील इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तचर संस्थेच्या हाती लागला आहे. त्यावरून, येत्या २८ जानेवारीपूर्वी शहरावर हल्ला चढवण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य आहे. मंगळवारी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहता या दिवशीच हल्ला होण्याची शक्यता आहे. आयबीकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, जमात-ऊल-दावा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या चार दहशतवादी संघटनेचे दहशतवादी देशात दाखल झाल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अतिरेक्यांचे चार वेगवेगळे गट बनवण्यात आले असून हे गट अनुक्रमे महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओदिशा या राज्यांमध्ये पाठवण्यात येणार असल्याचा तपशीलही आयबीच्या हाती लागला आहे. यापैकी मुंबईला लक्ष्य करण्याची जबाबदारी अब्दुल्ला-अल-कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर या अतिरेक्यांवर सोपवण्यात आली आहे.