मुंब्रा-औरंगाबादेतून अटक आरोपींच्या चौकशीतून खुलासा; नागपाडय़ातील दवाखाना लक्ष्य

जयेश शिरसाट, मुंबई</strong>

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)मुंब्रा-औरंगाबादेतून अटक केलेला आयसीस समर्थक गट महापालिका कर्मचाऱ्यांवर विष प्रयोग करणार होता. आधी घरगुती वस्तूंपासून तयार केलेल्या विषारी द्रव्याने कोंबडय़ांवर अपेक्षित परिणाम न झाल्याने या गटाने पालींपासून विष तयार केले होते. गटातील प्रमुख आरोपी कार्यरत असलेल्या पालिकेच्या नागपाडा येथील दवाखान्यातील अन्य कर्मचाऱ्यांवर त्याचा प्रयोग करणार होता, असे उघड झाले आहे.

आयसीस म्होरक्याच्या संपर्कात आल्यानंतर या गटाने सीरियात जाण्यासाठी हट्ट धरला. मात्र जिथे वास्तव्यास आहात तिथेच घातपात, दहशतवादी कृत्य घडवा. त्यानंतर सीरियात नेण्याबाबत विचार केला जाईल, असा निरोप म्होरक्याकडून आला. मोठय़ा समारंभांमध्ये अन्नात विष कालवून किंवा पाणी साठय़ांमध्ये विषारी द्रव्य मिसळून घातपात घडवण्यासाठी हा गट सातत्याने प्रयोग करत होता, अशी माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली. बाजारात सहजपणे उपलब्ध असतील आणि घरातही त्यांचा वापर होत असेल अशा वस्तूंपासून विष तयार करण्याचे प्रयत्न त्यांनी  सुरू केले. सुरुवातीला सुके मनुके, चिंचोका, धोत्र्याची फुले आदी वस्तूंवर प्रक्रिया करून विषारी द्रव्य तयार केले. चाचणीसाठी त्यांनी कोंबडय़ांसह अन्य प्राण्यांवर विषारी द्रव्याचा प्रयोग केला. मात्र कोंबडय़ांवर काहीच परिणाम होत नाही हे पाहून या गटाने पालींपासून विष तयार करण्याचे ठरवले.

या गटातील जमान नवाब खुटेपाड हा आरोपी नागपाडा चौकातील महापालिकेच्या दवाखान्यात फार्मासिस्ट म्हणून काम करत होता. विष तयार करण्याची मुख्य जबाबदारी खुटेपाडकडे होती. त्याने दवाखान्यातून औषधे, रसायनांचा साठा मुंब्रा येथील घरी केला होता. तसेच औरंगाबादेतील अन्य सहकाऱ्यांनाही धाडला होता. खुटेपाडचे प्रयोग फसू लागल्याने गट त्याच्यावर नाराज होता. त्यामुळे त्याने पालीपासून विष तयार करू, असा पर्याय सुचवला. त्याने पालींना मारून त्यापासून विषारी द्रव्य तयार केले होते. त्या द्रव्याचा प्रयोग तो दवाखान्यातील सहकाऱ्यांवर करणार होता. त्यांच्या अन्नात हे द्रव्य मिसळून चाचणी घेणार होता, अशी माहिती पुढे आली आहे.

जम्मूत १५ हजार रुपयांचा व्यवहार

या गटातील अबुबकर हनीफ पोतरीक ऊर्फ तलाह या आरोपीने डिसेंबर-जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मिर येथे १५ हजार रुपये पाठवले होते. आयसीस म्होरक्याने या गटाचा हट्ट पाहून सीरियाऐवजी अफगाणीस्तान सीमेपर्यंत नेण्याची व्यवस्था करू शकेल, असे स्पष्ट केले होते. त्याची तजवीज करण्यासाठी म्हणून तलाहने त्याच्या नावे काश्मिरमध्ये १५ हजार रुपये आगाऊ पाठवल्याची माहिती पुढे आल्याचे समजते.