अटकेतील संशयिताकडून बंदराची छायाचित्रे हस्तगत

जयेश शिरसाट मुंबई गुजरातमधून अटक केलेल्या संशयित अतिरेक्याने मोबाइलमधून काढून टाकलेली छायाचित्रे हस्तगत करण्यात राज्य दहशतवादविरोधी पथक(एटीएस) आणि न्यायवैद्यक प्रयोग शाळेला यश आले आहे. त्यात गुजरातच्या मुंद्रा बंदराची सुमारे दहा छायाचित्रे आहेत. या छायाचित्रांवरून देशातील सर्वात मोठे खासगी बंदर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, असा अंदाज बांधून एटीएसने पुढील तपास व चौकशी सुरू केली आहे.

अल्लारखा खान असे या संशयित अतिरेक्याचे नाव आहे. मे महिन्यात त्याला एटीएसने गुजरातच्या गांधीधाममधून अटक केली होती. या कारवाईआधी एटीएसने पश्चिम बंगालच्या विशेष कृती दलाच्या मदतीने जोगेश्वरीतून फैजल मिर्झा(३२) या पाक प्रशिक्षित संशयिताला अटक केली. त्याच्याच चौकशीतून अल्लारखाचे नाव पुढे आले होते. कुख्यात गुंड छोटा शकिल याचा साथीदार आणि सध्या शारजा येथे व्यवसाय करणाऱ्या फारुख देवडीवाला याने फैजलला पाकिस्तानला धाडले होते. फैजल देवडीवालाचा आत्तेभाऊ आहे तर अल्लारखा मित्र.

मुंबईत अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवेत चालक म्हणून काम करणारा अल्लारखा फैजलच्या सूचनेवरून गांधीधाम येथे वास्तव्यास होता. हल्ल्यासाठीची स्फोटके किंवा अन्य आवश्यक वस्तू गुजरातेत आणण्याची जबाबदारी अल्लरखा याच्यावर होती. त्याची मुंद्रा बंदरावरली ये-जा ही हल्ल्याआधीची पाहाणी होती, असा संशय छायाचित्रे हाती लागल्यानंतर एटीएसकडून व्यक्त होत आहे.

देवडीवाला शकिलच्या माध्यमातून आयएसआयच्या संपर्कात आला. भारतातील विशेषत: मुंबईतील तरुणांना शारजामार्गे पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठवण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली होती. फैजलने पाकिस्तानातील प्रशिक्षण केंद्रात बॉम्ब(इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझीव्ह डीव्हाइस) तयार करण्यासह घातपात घडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या छायाचित्रांसह पुढील तपासाबाबत एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपासातील संवेदनशील माहिती देता येणार नाही, असे सांगितले.

छायाचित्रे ‘आयएसआय’च्या म्होरक्याला पाठवली?

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीवरून अटकेआधी एका भंगार व्यावसायिकासोबत अल्लारखा आणि त्याचा एक नातेवाईक मुंद्रा बंदरावर अनेकदा गेले. कधी व्यवसायानिमित्त तर कधी मजुरी मिळावी या हेतूने अल्लारखाची बंदरावर ये-जा होती. याच दरम्यान त्याने बंदरावरील महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे काढली असावीत. ही छायाचित्रे त्याने देवडीवालाकरवी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या म्होरक्याला (हॅण्डलर)पाठवली आणि नंतर मोबाइलमधून काढून टाकली, असा एटीएसचा अंदाज आहे.