कारागृहातही कैद्यांचे मूलभूत अधिकार कायम राहतात, असे नमूद करत करोनाची लक्षणे असलेल्या सगळ्या कैद्यांची करोना चाचणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.

कैद्यांचा करोनापासून बचाव करण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) घालून दिलेली नियमावली आणि सरकारने तयार केलेल्या सुधारित मार्गदर्शिकांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच करोनाच्या पाश्र्वभूमीवर सरकारने कारागृहातील कैद्यांची नियमित तपासणी करणे, कारागृहात स्वच्छता ठेवणे, अंतरनियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेशही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.