मुंबई : करोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार आणि तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन परदेशातून हवाईमार्गे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच प्रवाशांना स्वखर्चाने ‘आरटीपीसीआर’ चाचणी करावी लागणार आहे. येत्या शुक्रवारपासून (३ सप्टेंबर) या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून ब्रिटन, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वेमधून येणाऱ्या प्रवाशांना ही चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांपूर्वी के लेल्या आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल दिल्यानंतर विमानतळाबाहेर जाता येईल.

करोना विषाणूचा वेगाने पसरणारा नवा प्रकार आढळल्यामुळे केंद्र शासनाने परदेशातून हवाईमार्गे भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यानुसार हवाई प्रवास करून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची तरतूद रद्द करण्यात आली आहे. मात्र नव्या नियमावलीनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर तात्काळ स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे.

ब्रिटन, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे या देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीमुळे यापूर्वीच्या परिपत्रकानुसार लागू करण्यात आलेले अपवादात्मक निर्णय रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या देशांतून येणाऱ्या करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या, तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना चाचणीबाबत दिलेली सूट रद्द करण्यात आली असून प्रवाशांना विमानतळावर चाचणी करावीच लागणार आहे.

नव्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई विमानतळाच्या संचालन यंत्रणेने प्रवाशांची चाचणी करण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे.