बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत ठाकरे हा सिनेमा आजच प्रदर्शित झाला. सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांचे आयुष्य चितारण्यात आले आहे. एक पत्रकार ते शिवसेना प्रमुख असा वादळी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र मनसैनिकांनी आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. यामधून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा संदेश देण्यात आला आहे. तसंच व्हिडीओच्या प्रत्येक फ्रेममध्ये बाळासाहेबांचा फोटो व या फोटोशी साधर्म्य असणारा राज यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. याचाच गर्भित अर्थ हा की उद्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणजे राज ठाकरे अशी मनसैनिकांची भावना असल्याचे सांगण्यात येत आहे.

पहा व्हिडिओ

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे हा सिनेमा आला. खासदार संजय राऊत हे सांगत असले की हा सिनेमा राजकीय नाही तरीही लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जनतेला बाळासाहेबांची आठवण करून द्यायची आणि मतं मागण्यासाठी त्याचा वापर करायचा हा शिवसेनेचा छुपा अजेंडा आहे असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या सिनेमावरून निर्माते असलेले शिवसेनेचे संजय राऊत व दिग्दर्शक असलेले मनसेचे अभिजीत पानसे यांच्यात झालेला वादही ताजाच आहे. अशात हा सिनेमा बाबरी मशीद पडते त्यासंदर्भातल्या खटल्यापाशी येऊन थांबतो. हा सिनेमा दोन भागात येईल म्हणजेच ठाकरेचा सिक्वल येईल हे उघड आहे. सिनेमाच्या शेवटी To Be Continued… अशी सूचना येते. म्हणजेच ठाकरे -2 येणार हे नक्की. हाच संदर्भ घेत मनसैनिकांच्या मनातील ठाकरे-2 चा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओसाठी जे गाणं वापरण्यात आलं आहे तेही ठाकरे सिनेमातलंच आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होतो आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना आपलं विठ्ठल मानून राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर शिवसेना आणि मनसे यांच्यातला सामना वारंवार पाहण्यास मिळाला आहे. आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जो व्हिडीओ व्हायरल करण्यात येतो आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली साम्यस्थळं दाखवणारे फोटो आहेत. या फोटोंना ठाकरे सिनेमातील गाण्याचं संगीत अत्यंत चपखल बसलं आहे. सिनेमाचे निर्माते संजय राऊत आहे जे शिवसेनेचे खासदार आहेत. तर दिग्दर्शक आहेत अभिजित पानसे जे मनसे मध्ये आहेत. अभिजित पानसे यांनी स्क्रीनिंगसाठी आपल्याला बसायला योग्य जागा मिळाली नाही असं सांगत पानसे यांनी थिएटर सोडलं अशी चर्चा आहे. त्यातून मनसे आणि शिवसेना पुन्हा समोरासमोर आले आहेत. आता ठाकरे-2 नावाने व्हायरल होणारा हा व्हिडीओही याच वादाचे पडसाद आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या व्हिडीओतून मनसेने शिवसेनेला प्रत्युत्तर देऊन आपल्या पक्षाला उभारी देण्याचा दुहेरी संगम साधला आहे असेच हा व्हिडीओ पाहून वाटते आहे. तसंच मनसेचेच असलेले दिग्दर्शक अभिजीत पानसे खरोखरच राज ठाकरेंवर ठाकरे २ तर काढण्याच्या विचारात नाहीत ना, असा प्रश्नही निर्माण होत आहे.