24 February 2021

News Flash

ठाकरे सरकारचा कारभार ‘अतिरिक्त’वर !

अनेक अधिकाऱ्यांना नियुक्तीच नाही, तर काही जणांकडे अतिरिक्त कार्यभार

(संग्रहित छायाचित्र)

घटकपक्षांचे मान-सन्मान, अधिकाऱ्यांमधील डावे-उजवे आणि संकटांमागून संकटे अशा कोंडीत सापडलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कारभार सध्या  ‘अतिरिक्त’वरच जास्त चालला आहे. सनदी तसेच गृह विभागांमध्ये अनेक अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त पदभार असताना, वरिष्ठ आणि अनुभवी सदानंद दाते यांच्यासह काही सनदी व पोलीस अधिकारी गेली पाच-सहा महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात सत्ताबदल होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील जवळच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.  संजय कुमार यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनातील विस्कटलेली घडी नीट बसेल अशी अपेक्षा केली जाते. मात्र आजही मुख्य सचिवनंतर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृह विभागाचा कारभार अतिरिक्त कार्यभारावरच सुरू आहे. संजय कुमार यांच्याकडे सुमारे दीड वर्षे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता तो सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे देण्यात आला आहे.

इक्बालसिंग चहल यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी बदली झाल्यापासून जलसंपदा विभागाचा अतिरिक्त कार्यभार नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याकडे आहे.

वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कारभार आहे.  गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. श्रीनिवास यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशीष कुमार सिंह यांच्याकडे परिवहन, तर त्यांच्या पत्नी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्याकडे पर्यटन विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदी मनीषा पाटणकर- म्हैसकर यांची बदली झाली असली तरी यांच्याकडे मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदाचा, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे यांच्याकडे गृह विभागाच्या अपील आणि सुरक्षा विभागाचा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त. एच. गोविंदराज यांच्याकडे वस्त्रोद्योग, तर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोके शचंद्र यांच्याकडे कोकण विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

याच वेळी अनेक सनदी अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राजीव जलोटा यांची ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी बदली झाली होती, पण ते या पदावर रुजू झाले नाहीत. भूषण गगराणी यांच्याकडे करोना व्यवस्थापन आणि उद्योग खात्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी असली तरी त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातून बदली झाल्यापासून खात्याचा पदभार सोपविण्यात आलेला नाही. शाम तागडे यांना वस्त्रोद्योग खात्याचा पदभार नको होता. यामुळे त्यांच्याकडे सध्या कोणताच पदभार नाही.

सदानंद दाते यांची प्रतीक्षा संपेना

* केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर असलेले सदानंद दाते हे पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत परतले; पण चार-पाच महिने झाले तरी त्यांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही.

* नव्याने स्थापन होणाऱ्या मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तपदासाठी दाते यांच्या नावाचा प्रस्ताव तयार झाल्याचे समजते.

* लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक, गुन्हा अन्वेषण विभागाचे सहआयुक्त, नक्षलवादविरोधी अभियानाचे महानिरीक्षक, वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षक या पदांचे कामकाजही अतिरिक्त कार्यभारावर सुरू असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:55 am

Web Title: thackeray government in charge of additional officials abn 97 2
Next Stories
1 मुंबईत दिवसभरात १,३१० रुग्ण
2 नववी आणि अकरावीची तोंडी फेरपरीक्षा
3 व्यायामशाळा, मॉलबाबत लवकरच निर्णय – टोपे
Just Now!
X