News Flash

“वर्षभर ‘स्थगितीचे नकारात्मक’ डीजे कोण वाजवतय हे उघड झालेच ना?”

भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा

संग्रहीत

मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्याने सुनावणी घेणार का, की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू? अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “शास्त्रीय गायनाच्या रंगलेल्या मैफलीत वर्षभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतय हे उघड झालेच ना?” असा खोचक प्रश्न त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

“अहंकारी राजाच्या कांजूरमार्गला मेट्रो कारशेड उभारण्याच्या “डीजे” वाजवण्याला उच्च न्यायालयाने चांगलींच तंबी दिली. कोट्यावधीचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? गेले वर्षभर मुंबईकरांच्या मेट्रोचा हा खेळ खंडोबा करुन डीजे डान्स करणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची आता माफी मागावी!” अशी टीका शेलार यांनी केली आहे.

तसेच, “न्यायालयाने स्पष्ट शब्दात कांजूरमार्गच्या निर्णयाबाबत सरकारला फटकारले आहे. पुन्हा सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत, असे सांगत आरे कारशेड का नको? असा सवाल ही केलाय. शास्त्रीय गायनाच्या रंगलेल्या मैफलीत वर्षभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालेच ना?” असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, बुधवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी असे वाद संपुष्टात आणायला हवेत, असेही न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. या जागेबाबतचा वाद दिवाणी न्यायालयात प्रलंबित असल्याचे माहीत असूनही त्याकडे कानाडोळा करण्यात आला आणि ही जागा मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कार्यान्वित राहावेत, असे सकृतदर्शनी आम्हाला वाटत नाही. म्हणूनच हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे जावे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपला आदेश मागे घेण्याबाबत विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कांजूर भूखंड हस्तांतरणाचा आदेश मागे घेता की रद्द करू ?

तर, “फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचं शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले,” असा टोला शिवसेनेने आज सामनातील अग्रलेखाद्वारे लगावला आहे. यावरून शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.

शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसं घडलं, शिवसेनेचा फडणवीसांना टोला

आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी केलेल्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूर येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 9:45 am

Web Title: thackeray government should apologize to the people now ashish shelar msr 87
Next Stories
1 मुंबईच्या वेशीवर पोलिसांचा फौजफाटा
2 ‘नाइट क्लब’मध्ये बेपर्वाई सुरूच!
3 उन्नत मार्गाच्या खर्चात वाढ
Just Now!
X