सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा ठाकरे सरकारने मलीन केली असा आरोप आता भाजपाचे नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांनी या प्रकरणात संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. भाजपाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नुसते आरोप करु नयेत तर पुरावे द्यावेत असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या मुद्यावरुन भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली असाही आरोप त्यांनी केला आहे. तसंच सुशांत सिंह प्रकरण ठाकरे सरकार सीबीआयकडे का सोपवत नाही असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने म्हणजेच पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या मागणीचाही हवाला राम कदम यांनी दिला आहे. नव्या पिढीचे हे विचार आहेत जे समजून घेतले पाहिजेत असंही राम कदम यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या त्यांच्या सामनातील सदरात एक सुशांत बाकी सगळे अशांत हा लेख लिहून भाजपावर टीका केली होती. तसंच सुशांतचं त्याच्या वडिलांशी पटत नसल्याचंही म्हटलं होतं. या सगळ्या प्रकरणावरुन सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा ठाकरे सरकारने मलीन केली असा आरोप आता राम कदम यांनी केला आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्र पोलिसांनी सुशांत सिंहच्या वडिलांवर केला हा गंभीर आरोप

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात बिहारमध्येही पोलीस तक्रार करण्यात आली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी ही तक्रार केली आहे. अशात सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी राम कदम यांनी पुन्हा एकदा केली आहे.

आणखी वाचा- “हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव…,” सुशांत सिंह प्रकरणी संजय राऊत यांचं खुलं आव्हान

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळं बॉलिवूड हादरलं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसातच ही आत्महत्या नसून हत्या आहे. सुशांतचा बळी हा घराणेशाही आणि गटबाजीमुळे घेतला गेला आहे असा आरोप होऊ लागला. यासंदर्भातली काही वृत्तही प्रसारित होऊ लागली. ज्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याने या तपासात लक्ष घातलं आणि हा अँगलही तपासण्यास सुरुवात केली. मात्र संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये जो लेख लिहिला त्यावरुन आता भाजपा नेते राम कदम यांनी त्यांच्यावर आणि सरकारवर टीका करत या प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यात आली असा आरोप केला आहे.