शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अन्त्यसंस्कारांसाठी शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात आलेला चौथरा अखेर सोमवारी हटविण्यात येणार आहे. अन्त्यसंस्कारांची जागा मोकळी करून सोमवारी ताब्यात दिली जाईल, असे पत्रच शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. मात्र या पत्रात सदर चौथरा ‘दूर’ करून जागा मोकळी करून देण्यात येईल, असे लिहिलेले असल्यामुळे शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्याची संकल्पना शिवसेनेने सोडली किंवा कसे ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनास येत्या सोमवारी (१७ नोव्हें.) एक महिना पूर्ण होत आहे. त्या वेळी अन्त्यसंस्कारांच्या जागेवरील चौथरा हिंदू धर्मशास्त्रानुसार विधिवत दूर करून जागा मोकळी केली जाईल, असे शिवसेनेने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे गेले महिनाभर चौथऱ्यावरून सुरू असलेल्या वादाला विराम मिळणारआहे.
शिवसेना नेते मनोहर जोशी व संजय राऊत यांनी शिवाजी पार्कवरच स्मारक होणार, अशी घोषणा केल्यापासून अन्त्यसंस्कारांच्या जागेवर शिवसैनिकांचा पहारा बसविण्यात आला होता. कायद्यानुसार या जागेवर कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही, हे स्पष्ट करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांनाच सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिवसेना नेत्यांशी चर्चा करून उद्धव यांनी अन्त्यसंस्काराची जागा मोकळी करून देण्याचा निर्णय घेतला.    

सर्व वादांना जानेवारीनंतर उत्तर :  बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर काही राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून जो वाद निर्माण केला जात आहे, त्यांचा समाचार घेण्यासाठी जानेवारीनंतर आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरा करणार आहोत.     – उद्धव ठाकरे (नागपूर येथे शुक्रवारी झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात.)