मुंबईतील कमला मिल अग्नितांडव दुर्घटनेला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर अशा घटना मुंबईत घडत राहतील कारण अशा घटना घडल्या की काही दिवसांनी त्या विस्मृतीत जातात. महापालिकेचे अधिकारी काहीही कारवाई करत नाहीत. फक्त चौकशी समितीचे नाटक होते, मुंबईकरांना मूर्ख बनवले जाते.  त्यानंतर हॉटेल मालक सर्रास नियम मोडतात कारण त्यांना ठाऊक असते की महापालिकेकडून कोणतीही कारवाई होणार नाही.

१ अबाव्ह या रेस्तराँला काही महिन्यांपूर्वीच सुरक्षेचे निकष पाळण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र या या रेस्तराँने काहीही केले नाही. आपण निकष तपासलेही नाहीतर तरीही चालते अशी बेजबाबदार भूमिका या हॉटेलमालकांनी घेतली कारण त्यांना मदत करणारे काही राजकीय हात त्यांच्या पाठिशी आहेत. तसेच हे निकष न पाळल्याबद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काहीही केले नाही. त्याचमुळे ही दुर्घटना घडली असाही आरोप राणे यांनी केला.

मुंबईचे महापौर आणि इतर अधिकारी यांना येथील परिस्थिती ठाऊक होती. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते आहे. मात्र इथे ज्या बेकायदा गोष्टी आहेत त्याकडे महापालिकेने अक्ष्यम दुर्लक्ष केले. येथील रेस्तराँमध्ये हुक्काही बेकायदेशीररित्या पुरवला जात होता. हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असाही आरोप नितेश राणे यांनी केला.

गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘१ अबव्ह’ या बारमध्ये आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. ही घटना घडली त्यावेळी तिथे सुमारे ५० हून अधिक जण उपस्थित होते. यातील १४ जणांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक जण जखमी झाले. दरम्यान या आगीला महापालिका आणि ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत असा आरोप आता नितेश राणे यांनी केला.