नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधत मध्य रेल्वेने आज ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्यासाठी मेगाब्लॉक जाहीर केला होता. दरम्यान, ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचं काम काही वेळापूर्वीच पूर्ण झालं असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली आहे.

मेगाब्लॉकमुळे डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तर काही प्रवाशांनी स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर गोंधळ घातला होता. तर दुसरीकडे मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या लोकल नसल्यानंही प्रवासी संतप्त झाल्याचे पहायला मिळाले होते. परंतु काही वेळापूर्वीच ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलावरील गर्डर टाकण्याचं काम काही वेळापूर्वीच पूर्ण झालं आहे. नियोजित वेळेपूर्वीच हे काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर राजधानी एक्स्प्रेस कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेनं रवाना करण्यात आली. तर गोरखपूर एक्स्प्रेस डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने रवाना झाली. मध्य रेल्वेने दर १५ मिनिटांनी डोंबिवलीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ट्रेन सोडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. परंतु रेल्वेचं हे नियोजन फसल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. परंतु मधल्या काळात काही रिकाम्या लोकल सोडण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला.

रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस
कोल्हापूर-सीएसएमटी सह्य़ाद्री,
भुसावळ पॅसेंजर,
पुणे सिंहगड,
मनमाड राज्यराणी, डेक्कन क्वीन,
पंचवटी एक्स्प्रेस
दादर-जालना जनशताब्दी.