सरकारच्या विविध सोयीसवलती आणि अनुदानासाठी अनिवार्य ठरलेल्या आधार कार्डासाठी ठाणे जिल्ह्य़ातील शहरी आणि ग्रामीण मिळून तब्बल ७२ टक्के नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी केली आहे.
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाचे नागरी, सागरी आणि डोंगरी असे तीन विभाग पडतात. २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी १० लाख लोकसंख्या असणाऱ्या या जिल्ह्य़ाची लोकसंख्या सध्या सव्वा कोटीच्या घरात आहे. वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्ताने येणारे बहुतेक जण प्रत्यक्षात ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमध्ये आश्रय घेतात. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत येथे स्थलांतरितांचे प्रमाणही जास्त आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील आधार कार्ड नोंदणी समाधानकारक असली तरी उर्वरितांनी तातडीने जवळच्या केंद्रात नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरी भागातील ५५ लाख ५४ हजार ७४७ तर ग्रामीण भागातील २३ लाख ९३ हजार ८३४ अशा एकूण ७९ लाख ३८ हजार ५८१ रहिवाशांनी आतापर्यंत आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. राज्यात सर्वाधिक ९८ टक्के आधार कार्ड नोंदणी गोंदिया जिल्ह्य़ात झाली असली तरी ठाण्याच्या तुलनेत तेथील लोकसंख्या खूप कमी आहे. गोंदियात एकूण १२ लाख ९९ हजार २६४ रहिवाशांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली. जिल्ह्य़ात एकटय़ा ठाणे महापालिका क्षेत्रात ११ लाख  ७२ हजार ६७ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी केली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १० लाख ४ हजार ४९४ तर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १० लाख २९ हजार ४५७ जणांनी आधार नोंदणी केली आहे. जिल्ह्य़ातील इतर महापालिकांपैकी वसई-विरारमध्ये ८ लाख ९३ हजार १७, मीरा-भाईंदर-७ लाख ५२ हजार ३५३, भिवंडीतील २ लाख ६४ हजार २६६ तर उल्हासनगरमधील ४ लाख ३९ हजार ९३ जणांनी ‘आधार’साठी नोंदणी केली आहे.

शहर        आधार कार्डधारक
ठाणे        ११ लाख  ७२ हजार ६७
कल्याण-डोंबिवली    १० लाख २९ हजार ४५७
वसई-विरार    ८ लाख ९३ हजार १७
मीरा-भाईंदर    ७ लाख ५२ हजार ३५३
भिवंडी        २ लाख ६४ हजार २६६
उल्हासनगर      ४ लाख ३९ हजार ९३