मुंबई आणि ठाण्यातील पुलांची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली असून ठाणे- भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला मंगळवारी तडे गेले आहेत. यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक मंदावली असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेले आयआरबी आणि एमईपी या कंपनीचे अभियंते घटनास्थळी रवाना झाले आहेत.

बोरिवलीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील पुलांचा प्रश्न चर्चेत आला आहे. ठाणे – भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला मंगळवारी सकाळी तडा गेला. यामुळे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील वाहतूक मंदावली. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, कळवा पूर्व येथील जमीन खचल्याने तीन घर कोसळले. यात जीवितहानी झाली नसली तरी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नाल्याच्या बाजूला राहणाऱ्या सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर साकेत येथील पुलाला गेलेला तडा सध्या स्टीलप्लेट टाकून बुजविण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री महाजन यांनी दिली आहे. पुलावरील रस्त्याला पडलेल्या भेगेमुळे पुलाला धोका नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाजन आणि त्यांच्या पथकाने नुकतीच साकेत पुलाला भेट देऊन पाहणी केली.