अनधिकृत इमारतींच्या धंद्यामध्ये बिल्डर आणि लोकप्रतिनिधींबरोबरच पालिका आणि पोलीस दलातील बडय़ा अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंतची एक मोठी साखळी कार्यरत असते, हे उघड गुपित शीळफाटा येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेने पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहे. या प्रकरणी  ठाणे पोलिसांनी दोन बिल्डरांसह नऊ जणांना अटक केली असून, त्यामध्ये महापालिका अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. या सर्वानी ७४ जणांचे बळी घेणाऱ्या त्या अनधिकृत इमारतीला अभय देण्यासाठी बिल्डरकडून लाखो रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
बिल्डर अब्दुल सलीम अजीज सिद्धिकी, जमील अहमद जलालउद्दीन शेख, ठाणे महापालिका उपायुक्त दीपक शरदराव चव्हाण, साहाय्यक आयुक्त बाबासाहेब सखाराम आंधळे, वरिष्ठ लिपिक किसन भास्कर मडके, राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा सीताराम पाटील, बांधकाम साहित्याचा पुरवठादार अफरोज आलम अन्सारी, डायघरचे पोलीस हवालदार जहांगीर उमरअली सैय्यद आणि दलाल सय्यद जब्बार रज्जाक पटेल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांना ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बेकायदेशीररीत्या जमीन ताब्यात घेऊन ठाणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा, तसेच त्या ठिकाणी लोकांना राहण्यास भाग पाडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा आरोप या सर्वावर ठेवण्यात आला असल्याचे ठाणे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी सांगितले.  ही अनधिकृत इमारत उभारण्यासाठी बिल्डर जमील आणि अब्दुल या दोघांनी सय्यद पटेल या दलालामार्फत पालिका उपायुक्त चव्हाण, साहाय्यक आयुक्त आंधळे, वरिष्ठ लिपिक मडके, नगरसेवक हिरा पाटील, हवालदार सैय्यद यांना पैसे दिले असून, त्यासंबंधीचे दस्तावेज हाती लागले आहेत. या अधिकाऱ्यांकडे बेहिशोबी मालमत्ता आहे का, यासंबंधीचा तपास ठाणे लाचलुचपत विभाग करत असून, या पथकाने पालिका उपायुक्त चव्हाण यांच्या घरावर छापा टाकून पाच लाख रुपयांची रोकड आणि मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे जप्त केली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांना तज्ज्ञ समिती हवी
लकी कंपाऊंड येथील अनधिकृत इमारत उभारण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते का, याचा तपास महापालिका तसेच फॉरेन्सीक लॅब करीत आहे. मात्र, त्यांचा अहवाल उशीरा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुन्ह्य़ाचा तपास वेगाने व्हावा तसेच गुन्हेगारांना लवकर अटक करता यावी, यासाठी बांधकामविषयक तज्ज्ञांची समिती नेमून तिच्यामार्फत मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी ठाणे पोलिसांकडून राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक नाईक यांच्यावर कारवाईची शक्यता..
लकी कंपाऊड येथील घटनेप्रकरणी डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. पी. नाईक यांना निलंबित करण्यात आलेले असतानाच, अनधिकृत इमारत उभारण्यासाठी बिल्डरकडून पैसे घेतल्याप्रकरणी याच पोलीस ठाण्यातील हवालदार सैय्यद यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नाईक यांचा या गुन्ह्य़ात काही सहभाग आहे का, याचा तपास ठाणे पोलिसांनी सुरू केल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. जमील आणि अब्दुल या बिल्डरचे सात भागीदार फरार असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.