महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याच्या मोटारसायकलवरील प्रकारामध्ये आता दागिने खेचण्यासाठी पाठीमागे बसलेला पुरूष साथीदार बदलला असून त्या जागी महिला आल्या आहेत. नौपाडा भागात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून मोटारसायकलवरून पळणाऱ्या पुरूषाला आणि त्याच्या महिला साथीदारास पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याने ही बाब समोर आली आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ामध्ये आता महिलांचाही सहभाग असल्याचे उघड होऊ लागले आहे.
सूरज रमेश शेट्टी (२२) आणि नाजीया फैयास शेख (२०), अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून हे दोघेही मुंबईतील गोवंडी भागात राहणारे आहेत. ठाणे येथील आनंदनगर भागात सविता सीताराम वडवले (४५) राहत असून त्या घरकाम करतात. रविवारी दुपारी त्या नौपाडा भागातील दोन घरातील कामे आटपून आनंद आश्रम सोसायटीमध्ये घरकाम करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी सूरज आणि त्याची महिला साथीदार नाजीया हे दोघे मोटारसायकलवरून त्यांच्या जवळ आले व नाजीयाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून पळ काढला. मात्र, त्यांनी आरडाओरड केल्याने काही नागरिकांनी पाठलाग केला असता, दोघेही मोटारसायकलवरून खाली पडले. घटनास्थळी दाखल झालेल्या नौपाडा पोलिसांच्या पथकाने दोघांनाही अटक केली.
या प्रकरणी ठाणे न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली आहे. मध्यंतरी सोनसाखळी चोरटय़ांना अटक करण्यासाठी ठाणे पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी सुरू केली होती. त्यामध्ये मोटारसायकलवर दोन तरूण असल्यास त्यांची कसून चौकशी केली जात होती. त्यामुळे पोलिसांच्या तावडीत सापडू नये तसेच पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये, यासाठी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ामध्ये महिलांना सहभागी करून घेण्यात येत आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.