मुंब्रा बायपासचे रखडलेले काम आणि यात मालवाहू वाहनांची पडलेली भर यामुळे मुलुंड टोलनाका ते ठाणे कोपरी पूल या मार्गावर चालकांना शुक्रवारी वाहतूक कोंडीचा ताप सोसावा लागला.

मुंब्रा बायपास रस्त्याचे दुरुस्ती काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतुकीचे नियोजन करण्यात प्रशासन आणि वाहतूक पोलीस अपयशी ठरताना दिसत आहे. शुक्रवारी सकाळी मुलुंड टोलनाका ते ठाण्यातील कोपरी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे चालकांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

दरम्यान, मुंब्रा बायपास रस्त्याचे काम सुरु असताना ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यांपैकी एकाच टोलनाक्यावर टोल आकारणी केली जाईल, अशी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली. मात्र, टोलनाका व्यवस्थापनांनी या घोषणेकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार चालक करत आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. गर्दीच्या वेळी मुख्य मार्गावर अवजड वाहने सोडणार नाही, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले होते. मात्र, शुक्रवारी देखील या मार्गावर अवजड वाहने आल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे समजते.

सलग तिसऱ्या दिवशी या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन ढासळले असून ठाणे- बेलापूर मार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीबाबत सरकारकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.