ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच घोडबंदर परिसरात जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेने या रस्त्यांवर तात्पुरता मुलामा चढविण्याचा निर्णय घेतला असून काही ठिकाणी त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली आहे. तसेच कोटय़ावधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले नवे कोरे रस्ते वर्षभरातच उखडल्याने ठेकेदारांकडून विनामूल्य बुजवून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गणेशोत्सवपूर्वी ठाणे शहर ‘खड्डे मुक्त’ होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.
जुन्या रस्त्यांव्यतिरिक्त ठाणे, कळवा, मुंब्रा या परिसरात अवघ्या वर्षभरापुर्वी कोटय़ावधी रुपये खर्चून नवे कोरे रस्ते तयार केले होते. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. तीन वर्षांची मुदत असतानाही त्याआधीच रस्ते खराब झाल्याने महापालिकेवर टीका होत आहे.