नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इफेड्रिन’ पावडरच्या तस्करीप्रकरणी ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयाने अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रगमाफिया विकी गोस्वामीविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

‘इफेड्रिन’ पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट ठाणे पोलिसांनी उघड केले होते. दोन हजार कोटी रुपयांच्या या रॅकेटमध्ये ममता कुलकर्णी, विकी गोस्वामीचा सहभाग असल्याचे समोर आले होते. इफेड्रिन पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये आणि हा व्यवसाय सुरळीतपणे चालावा, यासाठी मनोज जैन, ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी या तिघांनी एक प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार एव्हॉन कंपनीच्या शेअर्सचा दर ३५ ते ४० रुपये इतका आहे आणि कंपनीचे दोन कोटींपेक्षा जास्त शेअर्स आहेत. या शेअरचा दर २६ रुपये इतका ठरवून ११ लाखांपेक्षा जास्त शेअर्स ममता कुलकर्णीच्या नावे करण्यात येणार होते आणि त्यानंतर तिची कंपनीच्या संचालक पदावर नेमणूक करण्यात येणार होती.

अंमली पदार्थ्याच्या या रॅकेटप्रकरणी ठाणे पोलिसांचे पथक गेल्या वर्षभरापासून कसून तपास करत आहेत. तपासात पोलिसांना ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीविरोधात ठोस पुरावेही मिळाले. दोघेही या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात आढळले अशी माहिती सरकारी वकीलांनी न्यायालयात दिली. ममता कुलकर्णी आणि गोस्वामी यांच्या पत्त्यावर पोलीस जाऊन आले. त्यांना ओळखणाऱ्या लोकांचे जबाबही घेण्यात आले असे वकीलांनी निदर्शनास आणून दिले. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यावर न्यायाधीश एच एम पटवर्धन यांनी ममता आणि विकी गोस्वामीविरोधात वॉरंट काढले. ममता सध्या परदेशात असून विकी गोस्वामीला अमेरिकेतील तपास यंत्रणांनी अटक केली आहे.

ठाणे पोलिसांनी चार पथके तयार करीत ममता कुलकर्णी आणि विक्की  गोस्वामी यांचा शोध सुरु केला असून त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी पोलीस छापेमारी करत आहेत. तर त्यांचे नातेवाईक आणि भाऊ-बहीण यांच्याकडेही त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. भविष्यात न्यायालयाने त्यांना फरारी घोषित केल्यास त्यांच्या नावे असलेली संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत.

काय होता ममता आणि विकीचा प्लॅन ?
८ जानेवारी २०१६ रोजी इफ्रेडीन प्रकरणातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी याने केनियामध्ये एक बैठक घेतली. त्या बैठकीस एव्हॉन लाईफ सायन्सेस कंपनीचा संचालक मनोज जैन, अभिनेत्री ममता कुलकर्णी, किशोर राठोड, जयमुखी, डॉ. अब्दुला आणि त्याचे दोन साथीदार उपस्थित होते. टांझानियामध्ये डॉ. अब्दुला याची सबुरी फार्मा नावाची कंपनी असून तो विकी गोस्वामीचा व्यावसायिक भागीदार आहे. सोलापूरमधील एव्हॉन लाईफ सायन्सेस कंपनीतील इफ्रेडीन पावडरचा साठा सबुरी फार्मा कंपनीमध्ये पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. सबुरी फार्मामध्ये इफ्रेडीनवर प्रक्रिया करून त्यापासून मेथ अ‍ॅम्फाटामाईन (आईस) हा अंमली पदार्थ तयार करण्यात येणार होता आणि त्याची युरोप, अमेरीकासह जगातील विविध देशांमध्ये विक्री करण्याचे बेत आखण्यात आले होते.