लोकसहभागातून शहरातील समस्या सोडविण्याचा निर्धार ठाणेकरांनी, तर आता तरी राजकीय उदासीनता संपून शहराचा विकास होईल, असा आशावाद डोंबिवलीकरांनी रविवारी ‘लोकसत्ता ठाणे’ आयोजित वाचक मेळाव्यांमध्ये व्यक्त केला.
ठाणे परिसरासाठी ‘लोकसत्ता ठाणे’ हे परिपूर्ण सहदैनिक सुरू झाल्याच्या निमित्ताने आयोजित या दोन्ही वाचक मेळाव्यास वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रविवारी सकाळी रहेजा गार्डनमधील ठाणे क्लब हाऊसमध्ये आयोजित वाचक मेळाव्यात ‘ठाणेच का?’ या परिसंवादात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, चिन्मय मांडलेकर आणि आमदार संजय केळकर यांनी भाग घेतला. ठाण्यात परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख समन्वय आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शहर सोयीचे आहे, असे मत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केले. मकरंद अनासपुरे आणि चिन्मय मांडलेकर यांनीही ठाणेकर होण्यामागची कारणे देतानाच या शहरातील गैरसोयी आणि उणिवाही स्पष्टपणे मांडल्या. दीर्घकालीन नियोजन योजनांमध्ये सर्व सुबुद्ध ठाणेकरांनी एकत्र येण्याचे आवाहन डॉ. काकोडकर यांनी केले. त्याला त्वरित प्रतिसाद देत मकरंद अनासपुरे यांनी येऊर परिसरातील आदिवासी पाडय़ांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची तयारी दाखवली. चिन्मय मांडलेकर यांनीही त्यास सहमती दर्शवली. लोकप्रतिनिधी या नात्याने ठाण्यातील उणिवा दूर करण्याचे आश्वासन आमदार केळकर यांनी या वेळी दिले.डोंबिवलीकर खूप सोशीक आहेत. म्हणूनच गावकीचा ओलावा उशाशी ठेवून साऱ्या असुविधांशी सामना करीत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र आता नागरी समस्यांनी टोक गाठले आहे. नागरिकांचा जीव घुसमटतो आहे. सहनशीलतेचा अंत होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान आता तरी तातडीने मुंबई-ठाण्याप्रमाणे येथे विकास योजना राबविल्या जाव्यात, अशी अपेक्षा डोंबिवलीतील वाचक मेळाव्यात मान्यवरांनी व्यक्त केली. आता पालिकेत आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने डोंबिवली परिसरातील रस्ते, माणकोली उड्डाण पूल, कल्याण टर्मिनल, ठाणे-डोंबिवली समांतर रस्ता ही कामे येत्या पाच वर्षांत पूर्ण झालेली असतील, या आशादायक सुरावर या चर्चेचा समारोप झाला. ‘डोंबिवली गाव ते शहर – एक प्रवास’ या सर्वेश सभागृहात आयोजित परिसंवादात माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, टाटा टेलि सव्‍‌र्हिसेसचे व्यवस्थापन तज्ज्ञ माधव जोशी, ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर, अभिनेत्री तेजश्री प्रधान, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी भाग घेतला. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक दिनेश गुणे यांनी या मान्यवरांशी संवाद साधून त्यांना डोंबिवली गावापासून ते महानगरापर्यंत झालेल्या प्रवासाच्या विषयावर बोलते केले. ठाणे आणि डोंबिवली या दोन्ही शहरांमधील नागरिक मोठय़ा संख्येने या वाचक मेळाव्यांना उपस्थित होते.mu05