पारसिक बोगद्याजवळील वेगमर्यादा काढण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय; मुंबईकडील मर्यादा मात्र कायम

रखरखत्या उन्हामुळे करपून आता आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांच्या आयुष्यात येत्या आठवडाभरात पावसाची बरसात होण्याची शक्यता असताना मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या आयुष्यातही सुखाचे दिवस येणार आहेत. गेले दोन महिने पारसिक बोगद्याशी रेंगाळणारी गाडी आता ठाणे ते डोंबिवली यांदरम्यान सुसाट धावणार आहे. डाउन जलद मार्गावरील वेगमर्यादा काढण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून आता या मार्गावरून ८० किमी प्रतितास या वेगाने गाडय़ा धावणार आहेत. त्यामुळे ठाणे-डोंबिवली हा प्रवास पुन्हा एकदा १४ मिनिटांत होणार आहे. मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ांसाठी मात्र ही वेगमर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.

डीसी-एसी परिवर्तनामुळे पारसिक बोगद्यातील रूळ खाली करण्यात आले होते. मात्र या दरम्यान या रूळांमधील खडी गेली चार वर्षे साफ केली नसल्याने गाडय़ांच्या वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला होता. पारसिक बोगद्यात गेल्या काही वर्षांपासून पाणी गळती सुरू झाली आहे.

बोगद्यावरील डोंगरावर आणि आसपास झालेल्या अनधिकृत वस्तीमुळे बोगद्यात पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रूळांमधील खडीमध्ये पाणी साचून त्याचा परिणाम रूळांच्या एकंदरीत गुणवत्तेवर झाला होता.

त्यामुळे मध्य रेल्वेने या बोगद्यांमधील रूळांखालील खडी साफ करण्याचे आणि खडी बदलण्याचे काम दोन महिन्यांपासून हाती घेतले आहे. या कामामुळे पारसिक बोगद्याजवळ गाडय़ा प्रचंड धीम्या गतीने धावत असल्याने डोंबिवली-ठाणे यांदरम्यानच्या प्रवासासाठी तब्बल २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागत होता. परिणामी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते.

आता डोंबिवलीकडे जाणाऱ्या डाउन जलद मार्गावरील काम पूर्ण झाले असून मंगळवारपासून या मार्गावरील गाडय़ा ताशी ८० किमीने धावणार आहेत. त्यामुळे ठाण्यापासून डोंबिवलीपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा १४ मिनिटांत करणे शक्य होईल, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अप मार्गावरील काम आता पावसाळ्यानंतर हाती घेतले जाणार असून ते काम डिसेंबपर्यंत पूर्ण होईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.