लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाची डोकेदुखी दिवसागणिक वाढू लागली आहे. ठाण्यात पक्षाच्या अध्यक्षपदी अविनाश जाधव यांची नियुक्ती करताच संतापलेल्या ३० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत थेट राज ठाकरे यांच्या नेतृत्वालाच आव्हान उभे केले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या मध्यावर राज ठाण्यात येणार होते. मात्र, जानेवारी महिना उलटत आला तरीही राजदर्शन दुर्लभ झाल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आधीच शिगेला पोहोचली होती. त्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी कोणताही संवाद साधण्यापूर्वीच ठाणे शहर अध्यक्षपदी अविनाश जाधव यांची, तर संपर्कप्रमुख पदी अभिजित पानसे यांची नियुक्ती करत राज यांनी सर्वानाच धक्का दिला. या नियुक्त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना रुचल्या नसून त्याविरोधात नाराजीचे चित्र सोमवारी दिसून आले. ’राजसाहेब ठाण्यात काही आले नाहीत आणि अचानक नव्या शहर अध्यक्षाची निवड होते, हे धक्कादायक आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पदाचे राजीनामे दिले आहेत, अशी माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिली. बंडाळी केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहर सचिव, शाखा    अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.