सहजसोपे, पण आशयपूर्ण संवाद आणि कसदार अभिनयातून गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान उलगडून दाखवणाऱ्या उल्हासनगर येथील सी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘मड वॉक’ या एकांकिकेने ठाणे विभागातून अव्वल क्रमांक पटकावत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत प्रवेश केला, तर ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘मोजलेम’ आणि वसईच्या सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाची ‘कुछ तो मजा है’ या एकांकिका दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाच्या मानकरी ठरल्या.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागाची फेरी शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार top05पडली.  या स्पर्धेला अस्तित्व संस्थेचे सहकार्य, तर झी मराठीचे इलेक्ट्रॉनिक प्रायोजकत्व लाभले आहे. शनिवारी सकाळपासून गडकरी रंगायतन येथे रंगलेल्या या स्पर्धेची रंगत प्राथमिक फेरीतून निवडल्या गेलेल्या पाच एकांकिकांच्या सादरीकरणामुळे उत्तरोत्तर वाढतच गेली. कुठे लोकसंगीत, लोकनृत्याचा बाज, तर कुठे ऐतिहासिक घटनांचा पदर उलगडून दाखविताना दिलेला सामाजिक संदेश यामुळे ही स्पर्धा अधिकच वैविध्यपूर्ण ठरली. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेळी विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अंतिम फेरीत सहभागी झालेल्या पाच एकांकिकांमध्ये विजेत्या तीन एकांकिकांसह पनवेलच्या सी.के.टी. महाविद्यालयाची ‘माणसापरिस मेंढरं बरी’ आणि कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाची ‘अर्ध भिजलेली दोन माणसं’ या अन्य दोन एकांकिकांचाही समावेश होता, मात्र अंतिम फेरी खऱ्या अर्थाने गाजवली ती ‘मड वॉक’ आणि ‘मोजलेम’ या दोन एकांकिकांनी. गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान नेमकेपणाने उलगडून दाखविणाऱ्या श्रीपाद देशपांडे यांची ‘मड वॉक’ ही एकांकिका या वेळी परीक्षकांसह उपस्थितांची दाद मिळवून गेली. ‘जुनं होण्यात मजा नाही.. तर प्राचीन होण्यात मजा आहे’,  ‘माहीत असलेल्या सत्यावर स्वत:ची सही मारत फिरणे ही माणसाची जुनी खोड आहे’ अशा प्रकारची विनोदी, पण आशयगर्भ टिपणी करणारी ही एकांकिका मनाचा ठाव घेणारी ठरली. जगात बुद्धांच्या सर्वाधिक मूर्ती का आहेत? या प्रश्नावर ‘बुद्धाशिवाय एवढे टाकीचे घाव कोणाला सोसले असते?’ या एकांकिकेतील प्रतिप्रश्नाने काही क्षण सर्वानाच निरुत्तर केले. या एकांकिकेत प्रमुख भूमिकेत वावरणाऱ्या अभिजीत पवार यांनी उभे केलेले ‘बेन्जामिन’ हे पात्र विशेष प्रभावी ठरले.
तिसरा क्रमांक पटकावणारी जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘मोजलेम’ ही एकांकिकाही उपस्थितांची दाद मिळवून गेली. ४० पेक्षा अधिक कलाकार, तितक्याच बॅकस्टेज कलावंतांची फौज, डोळ्यांत भरणारे नेपथ्य आणि सकस संहिता हे या एकांकिकेचे वैशिष्टय़ ठरले. नाझी फौजांच्या छळछावण्यांमधून मृत्यूला कवटाळू पाहणाऱ्या ज्यू कैद्यांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करणारी ‘थिअरी’ मांडू पाहणारा पवन ठाकरे याने साकारलेला ‘डॉक्टर व्हिक्टर’ सर्वात उजवा ठरला.   अपत्य नसलेल्या दाम्पत्यांची व्यथा आणि कथा असलेल्या ‘कुछ तो मजा है’ या एकांकिकेतून सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.top04उत्कंठा.. उत्साह, जल्लोषाला खिलाडूवृत्तीची दाद
*अतिशय दमदार अशा सादरीकरणामुळे महाअंतिम फेरीत कोण स्थान पटकविणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. जोशी-बेडेकर महविद्यालयाची ‘मोजलेम’ आणि सी.एच.एम. महाविद्यालयाची ‘मड वॉक’ या दोन एकांकिकांनी सादरीकरणादरम्यानच उपस्थितांची दाद मिळवली होती. त्यामुळे अव्वल स्थानासाठी या दोघांतच प्रामुख्याने चुरस होती.
*उत्कृष्ट अभिनेता, संगीत, दिग्दर्शन, नेपथ्य, लेखन अशा पारितोषिकांवर ‘मड वॉक’ आणि ‘मोजलेम’ या दोन एकांकिकांचे वर्चस्व राहिले. त्यामुळे या दोन्ही महाविद्यालयांतील उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सवरेकृष्ट अभिनयाची दोन पारितोषिके या दोन्ही महाविद्यालयांच्या मुख्य पात्रांनी पटकावली तेव्हा दोन्ही बाजूंकडील विद्यार्थ्यांनी एकमेकांना टाळ्या वाजवून दाद दिली.
*तरीही महाअंतिम फेरीचे दरवाजे कुणासाठी खुले होणार याची उत्सुकता कायम होती. वसईच्या सेन्ट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या एकांकिकेने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविताच ही उत्कंठा शिगेला पोहोचली. द्वितीय क्रमांकाची घोषणा होण्यापूर्वी निवेदकाने ‘हा क्रमांक कुणालाच नको असतो’, अशा अर्थाने केलेल्या विधानाने दोन्ही बाजूंकडील स्पर्धकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
*अखेर द्वितीय क्रमांकासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘मोजलेम’ एकांकिकेची घोषणा होताच सी.एच.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘विजय आपलाच’ या न्यायाने एकच जल्लोष केला, मात्र काही क्षणातच भानावर येत जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या स्पर्धकांना त्यांनी उभे राहून दाद दिली, तर ‘सीएचएम’चे कलाकार पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठाकडे जात असताना स्पर्धक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धकांच्या प्रतिक्रिया
एकांकिकेतील प्रत्येक पात्र जसे रसिकांसमोर आपली भूमिका सादर करीत असते त्याचप्रमाणे पडद्यामागचे आमचे सहकारी नेपथ्य करण्यासाठी खूप मेहनत घेतात.  त्या मेहनतीचे फळ म्हणजे आमच्या एकांकिकेला मिळालेले पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक आहे.  ‘मड वॉक’ म्हणजे चिखलातले चालणे. समाजातील जात, धर्म, पंथ, रूढी म्हणजे चिखल. या चिखलात चालताना या विषयांचा परिणाम आपल्या माणूस असण्यावर होऊ नये. गौतम बुद्धाचा हा संदेश रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही केला. या गंभीर विषयासाठी आम्हाला उत्तम लेखक आणि दिग्दर्शक लाभले.
– अभिजीत पवार (सर्वोत्कृष्ट अभिनय, मड वॉक)

माझी एकांकिकेमधील भूमिका पुणेरी ढंगाची होती; पण पुणेरी बोलणे आणि वागणे याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. माझ्या पात्राला न्याय देण्यासाठी मी पुणेरी म्हणजे काय हे प्रथम एक महिना बघितले, वाचले आणि समजून घेतले. त्यानंतर मी माझ्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी ही एकांकिका आम्ही काही ठिकाणी सादर केली. मात्र त्या वेळी यश मिळाले नाही. ‘लोकसत्ता’ एकांकिका स्पर्धेत यश मिळवण्यासाठी आम्ही प्रत्येक पात्राने नेटाने प्रयत्न केले. रसिकांनी दिलेली दाद, परीक्षकांनी तटस्थपणे केलेले परीक्षण आम्हाला न्याय देऊन गेले.
– रोमारिओ काडरेस (मड वॉक)

मोठय़ा रंगमंचावर एकांकिका सादर करताना उपस्थित रसिक आणि परीक्षक यांचे दडपण असते. ते सांभाळून एकांकिकेतील मुख्य भूमिका व इतर पात्र यांचा समतोल कसा साधायचा हे गणित आम्हाला स्पर्धेच्या या अंतिम फेरीत गवसले. रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे एकांकिका सादरीकरण करण्यास आम्हाला आणखी उत्साह वाटला.
–  राहुल डोमाडे (मोजलेम)

पहिल्या फेरीत आम्ही ज्या ताकदीने एकांकिकेचे सादरीकरण केले, त्यापेक्षा या वेळी मोठय़ा रंगमंचावर एकांकिका सादर करताना आम्ही कुठे तरी कमी पडलो, असे माझे व्यक्तिगत मत आहे. रंगमंचावर कला सादर करताना एक जबाबदारी असते. त्याचे भान ठेवून आम्ही आमच्या पात्रांना शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला.   
– पवन ठाकरे (सर्वोत्कृष्ट अभिनय- मोजलेम)

समाजाला एक विचार करावयास लावणारी एकांकिका सादर करण्याचा आम्ही मनोमन प्रयत्न केला. कमीत कमी नेपथ्यात उत्तम सादरीकरण कसे होईल, असाही विचार होता. त्याप्रमाणे प्रत्येक पात्राने उत्तम सादरीकरण करून आम्ही या स्पर्धेत यश मिळवले आहे. अपत्यहीन दाम्पत्यांनी कुढत बसण्यापेक्षा एकाकीपणे जगणाऱ्या अनाथ मुलांना आधार द्यावा. त्यामुळे त्या मुलांना मायेचे छत्र मिळेल. शिवाय अशा दाम्पत्यांना कुटुंबजीवनाचा आनंदही लुटता येईल, ही संकल्पना मांडण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला.  
– अक्षय बरबोसे (कुछ तो मजा है)

एकांकिका सादर करत असताना रसिक प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळत होती. त्यामुळे आम्ही आमच्या पात्रांना न्याय देत आहोत, याची जाणीव झाली. चांगल्या प्रतिसादामुळे कला सादर करताना एक ऊर्जा मिळत होती. यापुढील काळात  हा अनुभव आम्ही गाठीशी ठेवू.