तीन वर्षांत केवळ ३० टक्के  कामे पूर्ण

मुंबई : रेल्वेवर भिस्त असणाऱ्या ठाणे व मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर व झटपट करण्यासाठी वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली ही मेट्रो-४ एमएमआरडीएकडून उभारली जाणार आहे. परंतु गेल्या तीन वर्षांत प्रकल्पाचे सरासरी काम अवघे ३० टक्क्यांपर्यंतच पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेट्रो-४ मध्य रेल्वेवरील तीन महत्त्वाच्या स्थानकांनाही जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवरील लोकलने मुंबई ते ठाणे दरम्यान दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. काही कारणास्तव ही सेवा कोलमडल्यास प्रवाशांचे अतोनात हाल होतात. रस्त्यावरील प्रवासात अधिक वेळ लागतो. एकं दरीतच मुंबई ते ठाण्यापर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठी आणि मेट्रोने मुंबईहून थेट ठाणे गाठण्यासाठी एमएमआरडीएकडून वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ चे नियोजन करण्यात आले. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१८ मध्ये प्रकल्पाच्या स्थापत्य कामाला सुरुवात झाली. हा प्रकल्प भक्ती पार्क येथून सुरू होऊन कासारवडवलीपर्यंत जाणार आहे. यातील भक्ती पार्क ते अमर महलर्पयचे काम १२.७१ टक्के च झाले आहे, तर मुलुंड ते माजिवडय़ापर्यंतचे काम ५२.८० टक्के  झाले आहे. प्रत्यक्षात स्थापत्य कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एप्रिल २०२२ पर्यंत ठेवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांत काही तांत्रिक अडचणींमुळे व अडथळ्यांमुळे प्रकल्पाची गती मंदावली होती. गेल्या वर्षांपासून करोनामुळे या प्रकल्पाच्या कामाची गती आणखी संथ झाल्याची माहिती देण्यात आली. या कामाचा आढावा सातत्याने घेतला जात असून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ‘एमएमआरडीए’कडून स्पष्ट करण्यात आले.

मेट्रो-४च्या कामाची प्रगती

  • भक्ती पार्क ते अमर महल  १२.७१ टक्के
  • गरोडिया नगर ते सूर्या नगर ४६.६० टक्के
  • गांधी नगर ते सोनापूर     २३.१० टक्के
  • मुलुंड ते माजिवडा        ५२.८० टक्के
  • कापूरबावडी ते कासारवडवली १७.४० टक्के

चालकविरहित मेट्रो गाडय़ा

वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्प पूर्ण होताच या मार्गावर ४४ मेट्रो गाडय़ा चालवण्याचे नियोजित आहे. या गाडय़ा चालकविरहित असतील, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

तीन उपनगरीय स्थानकांना जोडणार

मेट्रो मार्ग मुंबई उपनगरीय रेल्वेलाही जोडण्यात येत आहेत. वडाळा ते कासारवडवली मेट्रोही मध्य रेल्वेवरील भांडुप, कांजुरमार्ग आणि विक्र ोळी स्थानकाला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अभ्यासही सुरू आहे. मेट्रो व हे तीन स्थानके  पादचारी पूल किं वा सॅटिसने जोडतील. यामुळे तीन रेल्वे स्थानकांत उतरलेल्या प्रवाशांना मेट्रोकडेही जाता येईल.