वृक्षतोडीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेकडून मागे
ठाणे शहरातील घनदाट झाडे आणि हिरवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या येऊर, गावंडबाग तसेच पोखरण रस्ता क्रमांक दोनच्या रुंदीकरणाच्या नावाखाली येथील तब्बल १४०० वृक्षे भुईसपाट करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला होता. मात्र यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’चे सहदैनिक असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वृक्षतोडीचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. या रुंदीकरणाच्या कामात अडथळे ठरणारी बांधकामे तोडण्यात येत आहेत, तसेच या मार्गावरील वृक्षांचे दुसऱ्या ठिकाणी पुनरेपण करण्यात येत आहे. कॅडबरी जंक्शन ते शास्त्रीनगर नाका या पोखरण रस्ता क्रमांक एकच्या रुंदीकरणासाठी यापूर्वी १२०० दुर्मीळ वृक्षे हटविण्यात आली असून, या वृक्षांचे पुनरेपणही वादात सापडले आहे. असे असतानाच शहरातील येऊर, गावंडबाग तसेच पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी तब्बल १४०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. तसेच हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मान्यतेसाठी सादर केला होता. दरम्यान, या संदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शहरातून प्रस्तावाच्या विरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या. तसेच शुक्रवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीतही सदस्यांनी या प्रस्तावास विरोध दर्शविला होता, त्यामुळे हा प्रस्ताव काहीसा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अखेर आयुक्त जयस्वाल यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यामध्ये हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला.

आयुक्तांच्या सूचना..
* पोखरण रस्ता क्रमांक दोनवर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणामध्ये वृक्षतोड करू नये आणि सध्या अस्तित्वात असलेल्या पदपथाला जोडूनच सव्‍‌र्हिस रोड तयार करण्याचे सक्त आदेश आयुक्त जयस्वाल यांनी शहर विकास, उद्यान विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
* त्याचबरोबर सव्‍‌र्हिस रोडमध्ये येत असल्यास त्या वृक्षांचे पुनरेपण करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
* रस्ता रुंदीकरणामध्ये वृक्ष तोडण्यात येणार असल्याबाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही आयुक्तांनी केलेआहे.