प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ढिम्म रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कळव्यात ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांची गैरसोय करणे कितपत योग्य ?, असा सवाल आता प्रवासी उपस्थित करत आहेत.

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर शुक्रवारी चेंगरीचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत २३ प्रवाशांना जीव गमवावा लागला. रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये असंतोष खदखदत असून मनसेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसही रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्या (मंगळवार, ३ ऑक्टोबर) रेल रोको करणार असल्याचे जाहीर केले. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटरवर याबाबतचे ट्विटही केले होते.

मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता कळवा स्टेशनवर रेल रोको करण्यात येईल. बुलेट ट्रेनचे आश्वासन देणाऱ्या सरकारने उपनगरीय सेवेचे वाटोळे केले आहे, प्रवाशांच्या सोयीकडे दुर्लक्ष होत आहे. दिवा- कळवा या स्टेशनदरम्यान गर्दीमुळे प्रवासी ट्रेनमधून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नाही असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आनंद परांजपे आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होतील.

राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाला धारेवर धरण्याची गरज आहे, मात्र त्यासाठी रेल रोको करुन प्रवाशांची गैरसोय करणे कितपत योग्य, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहे. सध्या मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने सुरु असते, अशा स्थितीत रेल रोको करुन प्रवाशांच्या अडचणी वाढू शकतात, त्यामुळे मंगळवारी प्रवाशांनी सकाळी घरातून लवकर निघावे असे आवाहनही सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे.