ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नगररचनाकार पांडुरंग शेळके (५२) याला शुक्रवारी दुपारी दहा हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मुंबईतील मोहम्मद कुरेशी या बांधकाम व्यावसायिकाची मुरबाड परिसरात जागा असून तिचा अंतिम सीमा आखणी आराखडा मंजूर करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. या व्यावसायिकाकडून त्याने यापूर्वी ४० हजार रुपये घेतल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. मोहम्मद यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, या विभागाच्या पथकाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी सापळा रचून ही कारवाई केली.