दिवसाला १६ फेऱ्या, महिला मोटरमनकडे सारथ्य

मुंबई : ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल ३१ जानेवारीपासून नियमितपणे धावणार असून ३० जानेवारी रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल दिल्लीतून व्हिडीओ लिंकद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. पहिली वातानुकूलित लोकल चालवण्याचे सारथ्य महिला मोटरमनकडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार मनीषा म्हस्के यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. उद्घाटनानंतर शुक्रवारपासून या लोकलच्या दिवसाला १६ फेऱ्या होतील.

पनवेल स्थानकातून दुपारी अडीचच्या सुमारास ठाण्यासाठी वातानुकूलित लोकल चालवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा ठाणे ते नेरुळ स्थानकापर्यंत नेऊन पुढे कारशेडमध्ये रवाना केली जाणार आहे. ठाणे ते पनवेल, ठाणे ते वाशी, ठाणे ते नेरुळ अशा १६ फेऱ्या अप व डाऊन मार्गावर होतील. मध्य रेल्वेला एकूण सहा वातानुकूलित लोकल दाखल होणार होत्या. यातील पहिली लोकल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर वर्षभरात दुसरी लोकल सीएसएमटी ते पनवेल आणि उर्वरित दोन लोकल सीएसएमटी ते कल्याण दरम्यान चालवल्या जातील. एक लोकल ताफ्यात अतिरिक्त ठेवण्यात येईल.

एसी लोकलच्या उद्घाटनानंतर गुरुवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते विविध सुविधांचे लोकार्पणही होणार आहे. त्यात वांद्रे स्थानकातील पादचारी पुलाचे उद्घाटन, तसेच विलेपार्ले, अंधेरी, वसई रोड, नालासोपारा, मुंबई सेन्ट्रल, अंधेरी, ग्राण्ट रोड, गोरेगाव स्थानकातील पादचारी पूल, जोगेश्वरी स्थानकातील पादचारी पुलाचा करण्यात आलेला विस्तार या सुविधांचा समावेश आहे.