16 December 2017

News Flash

ठाणेकरांचा बसप्रवास आता महाग होणार

अपुऱ्या बसेस आणि ढासळणाऱ्या नियोजनामुळे लांबलचक रांगामध्ये तिष्ठत उभ्या राहणाऱ्या ठाणेकर प्रवाशांचे आगामी वर्षही

प्रतिनिधी, ठाणे | Updated: February 9, 2013 3:18 AM

अपुऱ्या बसेस आणि ढासळणाऱ्या नियोजनामुळे लांबलचक रांगामध्ये तिष्ठत उभ्या राहणाऱ्या ठाणेकर प्रवाशांचे आगामी वर्षही असेच हाल-अपेष्टांचे ठरण्याची शक्यता अधिक आहे. ठाणे परिवहन उपक्रमाच्या शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात जुन्याच घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडण्यात आला असून येत्या वर्षांत नव्या बसेसऐवजी भाडेवाढीचे ओझे प्रवाशांच्या पदरात पडण्याची शक्यता स्पष्ट दिसू लागली आहे. टीएमटीच्या ताफ्यात असलेल्या १२५ भंगार बसेसची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून नव्या बस खरेदीचा संकल्प या अर्थसंकल्पात सोडण्यात आला असून दिल्लीतून मिळणाऱ्या निधीच्या बळावर ७१ बसेस खरेदी करता येतील, असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे. प्रत्यक्षात यासंबंधी ठोस अशी कोणतीही योजना उपक्रमाकडे नाही, हेच या अर्थसंकल्पावरून स्पष्ट होत आहे.
जुन्याच योजनांवर अधिक भर देण्यात आलेला यंदाच्या वर्षांचा १७३ कोटी ७६ लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प शुक्रवारी परिवहन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प सादर करताना टीएमटीच्या बसेस बहुतेक मार्गावर ‘लंडन पॅटर्न’ वेळापत्रकानुसार धावत असल्याचा दावा व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी केला. हा लंडन पॅटर्न म्हणजे नेमके काय, याचा खुलासा मात्र अर्थसंकल्पात नसून गर्दीने टाकोटाक भरलेल्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या ठाणेकर प्रवाशी उपक्रमाच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत.
यंदाही अर्थिक तोटय़ात असल्याचे सांगत परिवहन सेवेने महापालिकेकडे अनुदानासाठी हात पसरले आहेत. त्याचप्रमाणे टीएमटीच्या तिकीट दरात भाडे वाढ करण्याचा प्रस्तावास प्रादेशिक परिवहन विभागाने मंजुरी दिल्यानंतर ती लागू करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. ठाणे महापालिकेच्या ताफ्यात सध्या ३१३ बसेस असून शहराची लोकसंख्या लक्षात घेता सुमारे ६०० बसेसची आवश्यकता असल्याची स्पष्ट कबुली व्यवस्थापकांनी अर्थसंकल्पात दिली आहे.
विशेष म्हणजे, ३१३ पैकी जेमतेम २०० बसेस आगाराबाहेर काढणे शक्य होत असून ७४ बसेस कायमस्वरूपी बंद असल्याचे वास्तव पुन्हा एकदा पुढे आले आहे. त्यामुळे नव्या बसेसची आवश्यकता असली तरी अपुऱ्या निधीमुळे त्या कशाप्रकारे खरेदी करता येतील याविषयी उपक्रम चाचपडताना दिसत आहे. दरम्यान, एमएमआरडीए क्षेत्रातील सार्वजनिक वाहतुकीत एकसूत्रीपणा यावा तसेच रेल्वे, बसने प्रवास करता यावा यासाठी ‘गो मुंबई स्मार्ट कार्ड’ योजना कार्यान्वित करण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली आहे.
उत्पन्नासाठी प्रयत्न
प्रवासी भाडे, जाहिरात, विद्यार्थी पास, निरुपयोगी वाहन/ वस्तू विक्री, पोलीस खात्याकडील प्रतिपूर्ती प्रलंबित, तसेच महापालिकेकडून मिळणारे अनुदान, असे एकूण १६८ कोटी ३३ लाख रुपये उत्पन्न परिवहन सेवेला प्राप्त होणार आहे.
सॅटीससाठी उपाययोजना
सॅटीस पुलावर बस गाडय़ा बंद पडत असल्याने प्रवाशांना तासन्तास उभे राहावे लागते तसेच त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तातडीने बसेस दुरुस्त करण्यासाठी सॅटीस पुलावर तिन्ही शिफ्टमध्ये कार्यशाळेचे कर्मचारी व ब्रेकडाऊन व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.

First Published on February 9, 2013 3:18 am

Web Title: thane peoples bus travel fare now going to rise