विनायक परब

 

साष्टी बेट म्हणजेच प्राचीन मुंबईतील आजवर सर्वाधिक उल्लेख देशातच नव्हे तर विदेशातही झालेले ठिकाण म्हणजे प्राचीन श्रीस्थानक किंवा आताचे ठाणे. टॉलेमी, मार्को पोलो, अल्बेरूनी, इब्न बतूता, लुडविको व्हर्देमा, फ्रायर, गॅमेल्ली करेरी आदी रशियन, इटालियन, ब्रिटिश पर्यटकांनी ठाण्याविषयी केलेल्या नोंदी या शहराच्या प्राचीनत्वाबरोबरच लोकप्रियतेचीही साक्ष देतात.

या सर्व नोंदींमध्ये विशेषत्वाने सापडतात त्या मासुंदा तलावाविषयीच्या नोंदी. ठाण्यात प्राचीन काळीही तलावांची संख्या खूप मोठी होती. सुमारे ५० वर्षांपूर्वी झालेल्या ठाण्याच्या पाहणीमध्ये ६३ तलाव आढळले होते. आज मात्र ही संख्या अवघ्या २०-२२ वर येऊन ठेपली आहे.

ठाण्याच्या एका बाजूने वसईची खाडी आतमध्ये येते तर दुसऱ्या बाजूलाही खाडीचाच परिसर आहे. एका बाजूने येणारी खाडी अरबी समुद्राशी थेट जोडली गेली आहे तर दुसरी बाजू प्राचीन घारापुरी बेटाशी खाडीने जोडलेली आहे. प्राचीन पर्यटकांच्या नोंदींनुसार सोपाऱ्याहून पुढे आल्यानंतर भाईंदरहून व्यापारी जहाजे आतमध्ये येत आणि ठाणेमार्गे कल्याणपर्यंत जात. तिथे माल उतरल्यानंतर नाणेघाटमार्गे जुन्नर असा व्यापारी मालाचा प्रवास होत असे. राहणे आणि व्यापार या दोन्हींसाठी ठाणे हे अतिशय सोयीचे ठिकाण होते म्हणूनच शिलाकार असोत किंवा यादव राज्यकर्ते त्यांनी ठाण्याचाच वापर राजधानी म्हणून केलेला दिसतो. श्रीस्थानक म्हणजे लक्ष्मीचा निवास असलेले ठिकाण हा अर्थच ठाण्याचे तत्कालीन महत्त्व पुरता स्पष्ट करणारा आहे. किंबहुना म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ताम्रपत्रे ही ठाणे परिसरामध्येच सापडली आहेत. अगदी अर्वाचीन कालखंडातही म्हणून पाचशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांचे आगमन झाले त्या वेळेस त्यांनी आणि नंतर आलेल्या ब्रिटिशांनीही ठाण्याचे महत्त्व कायम राखले. त्यामुळे मुंबईची माहिती प्रसिद्ध करणाऱ्या गॅझेटचे आधीचे नावही ठाणे गॅझेटिअर असेच आहे. ठाण्याच्या या ऐतिहासिक महत्त्वामुळेच इथे खूप मोठय़ा प्रमाणावर प्राचीन अवशेष आजही सापडतात. कधी ठाण्यातील तलावातून गाळ काढताना तर कधी इमारतींचा पाया खणताना.

ठाण्याला केवळ हा असा हिंदू राज्यकर्त्यांचाच इतिहास नाही तर अगदी ख्रिश्चनांचाही इतिहास आहे तोही अगदी सहाव्या शतकापासून. व्यापाराच्या निमित्ताने आलेले नेस्टोरिअन ख्रिश्चन हे मोठय़ा संख्येने ठाण्यात स्थायिक झाले होते. इसवी सनाच्या चौथ्या- पाचव्या शतकात होऊन गेलेल्या नेस्टोरिअसने ख्रिश्चन धर्मात एक वेगळा पंथ सुरू केला, नेस्टोरिअस हा तत्कालीन कॉन्स्टेंटिनोपोलचा आर्च बिशप होता. त्याने स्थापन केलेल्या चर्चला नेस्टोरिअन चर्च म्हणतात. ते ठाण्यात होते. आशियाचा प्रमुख बिशप हा ठाण्याची होता.

साष्टीच्या गवेषणामध्ये पहिल्या वर्षी ठाण्यामध्ये अभिरुची ओक, अनुजा पटर्वधन आणि विशाखा कुलकर्णी या संशोधक चमूने तर दुसऱ्या वर्षी त्यांच्या जोडीने अनुष्का माटे, स्वप्निल घंगाळे, आदित्य पाटील आणि अनुजा पाटील यांनी काम पाहिले. सिद्धेश्वर तलावातून सापडलेली ब्रम्हाची मूर्ती व ठाण्यातच इतरत्र सापडलेल्या सूर्यमूर्ती यांची पुनर्नोंद  तर त्यांनी केलीच मात्र त्याबरोबर काही अनेक नव्या नोंदीही केल्या. महत्त्वाचे म्हणजे शिलाहारकालीन जैन मंदिराचे अवशेष पोलीस लाइन परिसरात सापडले. त्याविषयी फारशी माहिती मात्र उपलब्ध नाही. शिलाहारकालीन मोठे मंदिरच इथे अस्तित्वात असावे, असे हारीने पडलेल्या अवशेषांवरून लक्षात येते. ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या आवारातही बरेच पुरावशेष आहेत, त्यांच्या नोंदी करण्यात आल्या. प्रसिद्ध कौपीनेश्वर मंदिर परिसरात एका बाकडय़ाच्या खाली स्तंभाचे अवशेष तर एका हॉटेलमध्ये प्राचीन मंदिराचे कूटशिखर शोभेची वस्तू म्हणून वापरल्याचे लक्षात आले. घोडबंदर परिसरात असेच मोठय़ा मंदिराचे खांब, खांबाच्या पायाजवळील अवशेष संशोधकांना सापडले.

पांचपाखाडी, कोपरी, कोलशेत, चरई, माजिवडे, नौपाडा या ठाण्यातील भागांमध्येही गवेषणादरम्यान अनेक महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या. कापूरबावडी – कलाभवन परिसरात गावदेवीच्या मंदिरामध्ये मध्यभागी मोठय़ा आकारातील गावदेवी व तिच्या आजूबाजूस प्रत्येकी तीन देवी असे अवशेष सापडले. याच परिसरामध्ये सापडलेल्या वैशिष्टय़पूर्ण चतुर्मुख शिवलिंगावर यापूर्वी डॉ. दाऊद दळवी व डॉ. कुमुद कानिटकर यांचे शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. चरई परिसर हा तर पुरावशेषांची खाणच ठरावा. इथे एके ठिकाणी आजही क्रुसाच्या खालच्या बाजूस स्टको कलेतील व्हर्जिन मेरीची जुनी मूर्ती चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते. तर इथेच आणखी एका ठिकाणी क्रुसाच्या पायासाठी चक्क हिंदू मंदिराच्या कळसाच्या ठिकाणी आमलकाचा वापर केलेला दिसतो. गेल्या दोन्ही वर्षांतील ठाण्याचे गवेषण हे ठाण्याच्या प्राचिनत्वावर अधिकच शिक्कामोर्तब करणारे ठरले!

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab