भिवंडीतील नवी वस्ती परिसरात शुक्रवारी सकाळी चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कल्याण- भिवंडी रस्त्यावर नवी वस्ती हा परिसर आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. नवी वस्ती परिसरात शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या इमारतीत १० ते १२ कुटुंब राहत होती. ही इमारत ५ वर्षे जुनी असून इमारत धोकादायक असल्याचे समजते.

ढिगाऱ्याखाली १७ जण अडकले होते. यातील सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर आठ जण या दुर्घटनेत जखमी झाले. ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यात एका लहान मुलीचा समावेश आहे. दुपारी ढिगारा उपसण्याचे काम थांबवण्यात आले. परिसरात अरुंद रस्ते असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.

नवी वस्तीतील घटनेने भिवंडीतील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.