मोदी लाटेवर स्वार होत ठाणे जिल्ह्य़ातील चारही लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी काही लाखांच्या मताधिक्याने कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचा पराभव करत जिल्ह्य़ातील राजकारणावर पुन्हा एकदा दबदबा निर्माण केला आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार संजीव नाईक यांचा सुमारे दोन लाख ८० हजार मतांनी पराभव करत शिवसेनेचे राजन विचारे यांनी पुन्हा एकदा ठाण्यावर भगवा फडकविताना जिल्ह्य़ात सर्वाधीक मतांनी निवडून येण्याचा मान मिळविला. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वरवर चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ.श्रीकांत एकनाथ िशदे यांनी आनंद परांजपे यांचा अडीच लाख मतांच्या फरकाने धुव्वा उडवित अगदीच एकतर्फी विजय मिळवला. ठाणे लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजीत पानसे यांना ५० हजार मतांचा आकडाही गाठता आला नाही, तर निवडणुक प्रचारात कल्याणात स्वतची हवा निर्माण करणारे मनसेचे राजू पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन तिकीट मिळविणारे कपील पाटील यांनी भिवंडी मतदारसंघात कॉग्रेसचे विश्वनाथ पाटील यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करताना मुस्लिम, कुणबी, आगरी बहुल असलेल्या भिवंडीत मोदी लाटेचा प्रभाव एकप्रकारे अधोरेखीत केला. या मतदारसंघातील मुस्लिम बहुल वस्त्यांमधून कॉग्रेसला तब्बल १९ हजार मतांची आघाडी होती, परंतु कल्याण पश्चिम आणि मुरबाड विधानसभा क्षेत्र मिळून मिळालेल्या एक लाखाच्या मताधिक्यामुळे कपील यांचा विजय सुकर झाला.
पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.चिंतामण वणगा यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना दोन लाख ३९ हजार मतांनी अस्मान दाखवित वसई-विरारचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांना मोठा धक्का दिला. वसई, विरार, नालासोपारा, बोईसर या ठाकूरांच्या बालेकिल्ल्यातही बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पिछाडीवर रहावे लागल्याचे चित्र दिसून आले.
ठाणे लोकसभा मतदारसंघात मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागलेल्या संजीव नाईक यांना नवी मुंबईतील त्यांच्या बालेकिल्ल्यातही तब्बल ४५ हजार मतांनी पिछाडीवर रहावे लागल्याचे चित्र दिसून आले. पालकमंत्री गणेश नाईक प्रतिनिधीत्व करत असलेल्या बेलापूर विधानसभा क्षेत्रात संजीव नाईक सुमारे २५ हजार मतांनी पिछाडीवर पडले, तर ऐरोली विधानसभेतही त्यांना २० हजार मतांचा फटका बसला. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर भागात राजन विचारे यांना ४० हजाराचे मताधिक्य मिळाले.  कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा-मुंब्रा या जितेंद्र आव्हाडांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले.