व्यापाऱ्यांच्या समर्थनासाठी आमदार केळकर रस्त्यावर

ठाणे रेल्वे स्थानकाचा परिसर कोंडीमुक्त व्हावा यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील त्रुटींवर बोट ठेवत भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर गुरुवारी सकाळी बाधित व्यापाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरल्याने ठाण्यातील रस्ता रुंदीकरण मोहिमेविरोधात प्रथमच राजकीय सूर जाहीरपणे व्यक्त होत असल्याचे चित्र पुढे आले आहे. सकाळी अकराच्या सुमारास केळकर यांनी आपल्या समर्थकांसह मुख्य बाजारपेठ तसेच शिवाजी पथ परिसराचा दौरा केला आणि बाधित व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना दूरध्वनी केला आणि व्यापारी आणि नागरिकांचे पुनर्वसन झालेच पाहिजे, असा आग्रही सूर लावला. केळकर यांच्या या दौऱ्यामुळे कालपर्यंत सहकार्याच्या भूमिकेत वावरणारा व्यापाऱ्यांचा एक गट आक्रमक होताना दिसला. महापालिका प्रशासनाने मात्र केळकरांच्या दौऱ्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा जोरकसपणे सुरू ठेवत राजकीय हस्तक्षेपाला फारशी भीक घालणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाणे, कळवा शहरांतील वेगवेगळ्या भागांतील रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या महिनाभरापासून मोहीम हाती घेतली असून यामध्ये आड येणारी बेकायदा बांधकामे, दुकाने तसेच अतिक्रमणांविरोधात जोरदार कारवाई केली जात आहे. पोखरण रोड, कळव्यातील बुधाजी नगर, घोडबंदर भागातील सेवारस्त्यांमध्ये आड येणारी हजारो अतिक्रमणे आतापर्यंत जमीनदोस्त करण्यात आली आहेत. टी. चंद्रशेखर यांच्यानंतर प्रथमच ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे जमीनदोस्त केली जात आहेत. हे करत असताना बाधित होणाऱ्या रहिवाशांचे तसेच दुकानदारांचे तातडीने पुनर्वसन करण्याची भूमिकाही महापालिका प्रशासनाने स्वीकारली आहे. बुधाजी नगर तसेच पोखरण रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचे बीएसयूपी तसेच रेन्टल हाऊसिंग योजनेतील घरांमध्ये पुनर्वसन केले जात आहे.

९०० बांधकामांवर कारवाई

  • जयस्वाल यांनी १ मार्चपासून ठाणे स्थानक परिसरातील अतिक्रमणे तसेच रस्ता रुंदीकरणात आड येणारी वाढीव बांधकामांचे पाडकाम सुरू केले आहे
  • या कारवाईत तळ अधिक दोन मजल्यांच्या कोहिनूर इमारतीसह आतापर्यंत सुमारे ९०० बांधकामांना तिलांजली देण्यात आली आहे
  • कारवाई पूर्ण होताच पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे
  • स्टेशन रोड भागात मोठय़ा प्रमाणावर गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची दुकाने असून गेल्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणित लक्षात घेऊनच ‘हक्का’चा मतदार दुखावला जाऊ नये यासाठीच केळकर रस्त्यावर उतरल्याची चर्चा आहे

शहरातील कोणत्याही भागातील रस्त्याच्या रुंदीकरणास विरोध नाही. चंद्रशेखर यांचा धडाका शहरभर सुरू असताना त्यांना पाठिंबा देणारा मी आणि माझा पक्ष एकमेव होते हे विसरू नका. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली काही व्यापाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असून शहर विकास विभागाने आखणी केलेल्या रस्त्याचे सीमांकन अनेक ठिकाणी चुकल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांचे म्हणणे कुणी तरी ऐकायला हवे याच भावनेतून तेथे गेलो होतो.

– संजय केळकर, भाजप आमदार