शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथेच त्यांचे स्मारक झाले पाहिजे, असा आग्रह धरत चबुतऱ्याच्या संरक्षणासाठी ज्येष्ठ नेते मनोहर जोशी धावले, परंतु त्यांच्या मदतीला ठाण्याची शिवसेनेची फौज आली. मुंबईचे सैनिक गेले कुठे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेनेचा मुंबईतील एकही आमदार शिवाजी पार्ककडे फिरकला नसल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचे स्मारक झाले पाहिजे, अशी जाहीर मागणी सेना नेते मनोहर जोशी यांनी पहिल्यांदा करुन एका नव्या वादाला तोंड फोडले. त्यानंतर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ती मागणी उचलून धरली. परंतु स्मारकावरुन कोण जोरात बोलते, यावरून जोशी व राऊत यांच्यात स्पर्धेचे वातावरण तयार होत असतानाच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्मारकाबाबत लाखो शिवसैनिकच ठरवितील काय करायचे ते अशी वरकरणी सबुरीची भूमिका घेतली, पण त्यात गर्भित धमकी होती. मात्र स्मारकाबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली नाही. त्यामुळे शिवसैनिकही तसे संभ्रातच आहेत.
बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार केलेल्या जागेवर बांधण्यात आलेला चबुतरा काढून टाकण्यावरुन महापालिका प्रशासन व शिवसेना असा वाद सुरु झाला. सहा डिसेंबरपूर्वीच चबुतरा काढण्याचे प्रयत्न होते, परंतु वातावरण बिघडू नये म्हणून पालिका व सरकारनेही सबुरीची भूमिका घेतली. सहा डिसेंबरनंतर चबुतऱ्याचे बांधकाम काढणार अशी कुणकुण लागल्याने ८ डिसेंबरला शेकडो शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर धाव घेतली व चबुतऱ्याला पाहरा दिला. त्यात मनोहर जोशी व संजय राऊत आघाडीवर होते. ठाण्याचे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे व प्रताप सरनाईक यांनी त्यांना साथ दिली.
मात्र मुंबईतील चारपैकी एकही सेनेचा आमदार त्या दिवशी शिवाजी पार्कवर दिसला नाही.  काँग्रेसमध्ये काही काळ राहून पुन्हा स्वगडावर परतलेले व दादरमधून एकदा विधानसभेवर निवडून गेलेले सदा सरवणकरही कुणाच्या नजरेस पडले नाहीत.  मुंबईत शिवाजी पार्क असताना बाळासाहेबांच्या चबुतऱ्याच्या संरक्षणाला मुंबईतील आमदार कसे आले नाहीत, अशी चर्चा सुरु झाली.