येत्या १ऑगस्टपासून ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन होऊन नव्या पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती होत असतानाच संपूर्ण महानगरीकरण झालेल्या ठाणे तालुक्याचे त्रिभाजन करून नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रांना स्वतंत्र तालुक्यांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी पार पडलेल्या अखंड ठाणे जिल्ह्य़ाच्या अखेरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
२०११ च्या जनगणनेनुसार ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तीन महापालिकांचा समावेश असलेल्या ठाणे तालुक्याची लोकसंख्या ३८ लाख ९९ हजार होती. सध्या ती ४० लाखांपेक्षा अधिक आहे. राज्यातील अनेक जिल्ह्य़ांपेक्षा ठाणे तालुक्याची लोकसंख्या जास्त आहे.त्यामुळे मुंबईतील जिल्ह्य़ांच्या धर्तीवर ठाणे तालुक्यास उपनगरी जिल्ह्य़ाचा दर्जा द्यावा आणि उर्वरित जिल्ह्य़ाचे विभाजन करावे, असेही काहींचे मत होते. जिल्हा विभाजनाचे स्वागत करतानाच लोकप्रतिनिधींनी मागविलेल्या हरकती सूचनांची सुनावणी न झाल्याबद्दल आमदार विवेकपंडित यांनी नाराजी व्यक्त केली. वसई, पालघर आणि भिवंडी या तालुक्यांचेही विभाजन करावे. तसेच वसई महानगरपालिका क्षेत्र ठाणे या शहरी जिल्ह्य़ास जोडण्याची सूचनाही त्यांनी केली.