ट्रान्स हार्बरवर वातानुकूलित लोकल जानेवारीअखेरीस

मुंबई : ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर वातानुकूलित लोकलमधून प्रवास केल्यास १८५ रुपये भाडे मोजावे लागण्याची शक्यता आहे. पहिल्या वातानुकूलित लोकलचा मार्ग निश्चित झाल्यानंतर त्याच्या भाडेदरावर चर्चा सुरू आहे. मंगळवारी या संदर्भात बैठक पार पडली. त्या वेळी अनेक मुद्दय़ांवर चर्चा करतानाच ही लोकल जानेवारीअखेरीस धावेल, अशी माहितीही मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेवर सुरुवातीला एकूण सहा वातानुकूलित लोकल चालवल्या जाणार आहेत. यातील पहिली लोकल नुकतीच दाखल झाली असून त्याच्या चाचण्याही सुरू आहेत. लोकलचा वेग, स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, सुरक्षेसंदर्भातील यंत्रणा इत्यादींचा चाचणीत समावेश आहे. पहिली लोकल ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्यात येईल. या लोकलचे भाडे किती असेल याविषयी प्रवाशांमध्ये उत्सुकताही आहे; परंतु वातानुकूलित लोकलचे भाडे प्रवाशांच्या खिशाला कात्री देणारे असेल हे निश्चित. सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी मूळ भाडय़ावर १.३ पट भाडे आकारून वातानुकूलित लोकलचे भाडेदर निश्चित केले जातात. पश्चिम रेल्वेवरही अशाच प्रकारे वातानुकूलित लोकलचे भाडेदर ठरवण्यात आल्यानंतर ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकलचे भाडेही त्याच पटीत आकारले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सध्या यावर चर्चाही होत आहे. त्यानुसार ठाणे ते पनवेलपर्यंतचे तिकीट दर १८५ रुपये असेल, तर एका महिन्याचा पास १ हजार ९८५ रुपये असणार आहे.

सध्या याच मार्गावर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे तिकीट १४५ रुपये आणि महिन्याचा पास ९६५ रुपये आहे. ठाणे ते ऐरोलीपर्यंतचे सध्या प्रथम श्रेणीचे तिकीट ५५ रुपये आणि महिन्याचा पास ४७५ रुपये असून वातानुकूलित लोकलचे भाडेदर अनुक्रमे ७० रुपये आणि ७५५ रुपये पास करण्यावर विचार सुरू असल्याचे सांगितले.

यावर अंतिम निर्णय लवकरच होईल. मंगळवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत वातानुकूलित लोकलबाबतच्या विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. त्या वेळी ही लोकल जानेवारीच्या अखेरीस चालवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेचे दर

पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या वातानुकूलित लोकलचे चर्चगेट ते विरापर्यंतचे भाडे २२० रुपये आहे. एका महिन्याचा पास २ हजार २०५ रुपये आहे, तर बोरिवलीपर्यंतचे तिकीट १६५ रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले.