राज्य सरकारच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने लागू केलेल्या स्थानिक संस्था करासंबंधी (एलबीटी) सुरुवातीस संयमी भूमिका घेणाऱ्या ठाण्यातील व्यापाऱ्यांनी बुधवारपासून बंदसमर्थक व्यापाऱ्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळपासून ठाण्यातील सर्व दुकाने अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी येथील व्यापारी संघटनांनी घेतला. भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील, असे आश्वासन व्यापारी संघटनेने दिले असले तरी किराणा मालासह इतर किरकोळ बाजारपेठाही बंद ठेवण्यात येतील, अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली.
स्थानिक संस्था करातील काही अटींवरून सरकार आणि व्यापाऱ्यांमध्ये सध्या जुंपली आहे. एलबीटीला विरोध करीत राज्यातील व्यापारी महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला असला तरी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मात्र इतके दिवस संयमाची भूमिका घेतली होती. काहीही झाले तरी सर्वसामान्य ठाणेकरांना वेठीस धरायचे नाही, अशी स्तुत्य भूमिका घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी सोमवारपासून नेमकी विरोधी भूमिका घेत ‘एलबीटी हटाव’चा नारा दिला होता. नव्या करातील काही अटी या जाचक असल्याचा आरोप ठाण्यातील व्यापारांनी केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी तसेच तोडगा काढण्यासाठी ठाणे व्यापार उद्योग महासंघाचे पदाधिकारी नगरविकासमंत्री भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांची भेट घेणार होते. मंगळवारी ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळास डावखरे यांनी भेट दिली, मात्र भास्कर जाधव त्यांच्या कार्यक्रमास आले नाहीत. डावखरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीस समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बुधवारपासून ठाण्यातील किरकोळ तसेच घाऊक असे सर्व व्यापारी बंद आंदोलन सुरू करतील, असा निर्णय या बैठकीनंतर घेण्यात आला. ठाण्यामध्ये अंदाजे ४० व्यापारी असोसिएशन्स आहेत. या बंदमध्ये भाजीपाल्यासह जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या बाजारपेठा मात्र सुरळीतपणे सुरू राहणार असल्याची माहिती ठाणे व्यापार उद्योग महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बुधवारी सकाळी नगरविकास राज्यमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.