ब्रिटिश आमदानीत मुंबईमध्ये मोठय़ा दिमाखात धावत असलेल्या ट्राम गाडय़ा ठाण्यातही धावू लागतील, या ठाणेकरांच्या आशेवर लवकरच पाणी फिरण्याची चिन्हे आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्यातील आनंदनगरपासून घोडबंदपर्यंत १६ किलोमीटर अंतराच्या मार्गावर ट्राम गाडय़ांचा प्रकल्प राबविण्याची घोषणा माजी आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली होती. हा प्रकल्प नवे आयुक्त असीम गुप्ता यांच्या मात्र पचनी पडेनासा झाला असून, ठाण्यात ‘ट्राम’ गाडय़ा हव्यात की िरगरूट प्रकल्प याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र सल्लागार कंपनी नेमली आहे. या कंपनीची स्थापना म्हणजेच ‘ट्राम’ला टाटा, अशी प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटत आहे.
ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी महापालिकेने शहरात द्रुतगती महामार्गालगत ‘लाइट रेल ट्रान्सपोर्ट’ (एलआरटी) सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पामुळे पैसा आणि वेळ यांची बचत होईल, तसेच वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची डोकेदुखीही कमी होईल, असा राजीव यांचा दावा होता. या रेल्वेला सहा डबे असतील आणि कमाल १५० प्रवासी क्षमता असलेली ही गाडी ताशी ४० किमी वेगाने धावेल, असा प्राथमिक आराखडा अभियंता विभागाने सादर केला होता. मात्र, ठाण्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता राजीव यांची ही ट्राम म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असल्याचा टोला त्यांच्या विरोधकांनी लावला होता. तरीही महापौर आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसमोर सादरीकरण करत ट्रामची कल्पना राजीव यांनी पुढे रेटली होती.
ट्राम प्रकल्प अद्याप फेटाळलेला नाही. मात्र ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांची भौगोलिक रचना पाहता तेथे ट्रामऐवजी िरगरूट वाहतूक प्रकल्प राबविणे अधिक योग्य असल्याचे माझे व्यक्तिगत मत आहे. तरीही तज्ज्ञ सल्लागारांमार्फत तपासणी करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
असीम गुप्ता, आयुक्त

अव्यवहार्य ट्राम
ठाण्यातील नियोजित ट्राम प्रकल्पासाठी प्रती किलोमीटरमागे सुमारे ८५ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. १६.५० किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पासाठी एक हजार कोटींपेक्षा अधिक खर्च येऊनही शहराच्या भौगोलिक रचनेची गरज हा प्रकल्प भागवू शकणार नाही, या मतावर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आले आहेत.