ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील बंद पडलेले दुरूस्ती वाहन हटविण्यात यश आल्यानंतर गुरूवारी सकाळपासून ठप्प असलेली ही रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येताना दिसत आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात या वाहतुकीचा भार मध्यरेल्वे आणि हार्बर रेल्वेमार्गावर वळविण्यात आल्यामुळे या दोन्ही रेल्वेसेवाही काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या दिसल्या. बुधवारी मध्यरात्री दुरूस्तीचे काम सुरू असताना ठाणे आणि ऐरोली या स्थानकांदरम्यान, पारसिक बोगद्याजवळ दुरूस्ती वाहन अडकून पडल्यामुळे ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे गुरूवारी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमन्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ठाण्याहून वाशी, बेलापूर, आणि पनवेल येथे जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना या सगळ्याचा मोठ्याप्रमाणावर फटका बसला. दोन्ही दिशेची वाहतूक बंद असल्याने प्रवाशी अनेक वेळ गाडीसाठी स्थानकांवर ताटकळत उभे राहिलेले दिसत होते. अखेर बराच काळ वाट पाहिल्यानंतर प्रवाशांनी रस्त्यांवरील वाहतूकीकडे आपला मोर्चा वळविल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावरही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. दरम्यान, या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाने ट्रान्सहार्बरच्या प्रवाशांना हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा दिली होती. याशिवाय, ठाण्याहून वाशीच्या दिशेने जादाच्या बसेसही सोडण्यात आल्या होत्या. मात्र, रेल्वेसेवा सुरू होण्यास तब्बल तीन ते चार तासांचा अवधी गेल्याने यादरम्यान प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.