रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी मुंबई येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत महविकासाघाडी सरकारवर टीका करणे सुरू केलं आहे. ही कारवाई पाहून आणीबाणीच्या काळाची आठवण होत असल्याचे, भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आले. शिवाय, राज्य सरकारविरोधात भाजपाकडून आंदोलन देखील केले जात आहे. भाजपा नेत्यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. सरकार विरोधात लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करताना, विविध माध्यमांना त्रास देताना भाजपा नेत्यांना आणीबाणी आठवत नाही? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

तसेच, ”पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं. असं म्हणत, ”पण याच ‘अभिनेत्या’मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप, ‘सोशल मीडिया हब’सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न/पत्रकारांचा हक्क हिरावणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा?” असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अटकेच्या कारवाईचा विरोध करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे”.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

तसेच,  ”महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. ही माध्यमांसोबत वागण्याची पद्धत नाही. ही घटना आम्हाला आणीबाणीच्या काळाची आठवण करून देत आहे, त्या दिवसांमध्ये माध्यमांना अशाप्रकारची वागणूक दिली जात होती.” असं केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत.

आणखी वाचा- भाजपा म्हणते, “साधू हत्याकांडातील आरोपींना जामीन अन् अर्णब यांना अटक ही तर आणीबाणीच”

अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा काय दावा-
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.