28 September 2020

News Flash

“जिवंत रूग्णास मृत घोषित केल्याचा ‘तो’ व्हिडिओ दिशाभूल करणारा”

मुंबई महापालिकेकडून देण्यात आली माहिती ; जाणून घ्या, नेमका काय आहे प्रकार

संग्रहीत छायाचित्र

मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात एका जिवंत रुग्णास मृत घोषित केल्याचा, एक व्हिडिओ समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्याने प्रचंड खळबळ उडालेली असतानाच, आता याबाबतची सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणण्याचा मुंबई महानगर पालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय, तो व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचेही सांगण्यात आले आहे. एवढेच नाहीतर कुठलीही शहानिशा करता व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.

अत्यंत दिशाभूल करणारे असे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसृत केल्यामुळे त्याचा थेट परिणाम रुग्णांचा या सार्वजनिक रुग्णालयांवर असलेल्या विश्वासाला तडा जाण्यात होत आहे. तरी, नागरिकांनी कृपया असे दिशाभूल करणारे व्हिडिओ कृपया ‘फॉरवर्ड’ किंवा ‘शेअर’ करू नयेत आणि कोविड विरोधातील आपल्या वैद्यकीय लढाईस बळ द्यावे ! असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

या व्हिडिओ संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले की, “ मुळात संबंधित रुग्ण अतिगंभीर परिस्थितीत अतिदक्षता विभागात भरती करून घेण्यात आला होता. डॉक्टरांनी त्याला वेळीच उपचार करून कृत्रिम श्वासोच्छ्वासाची नळी म्हणजे ‘Intubate’ करून प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला. त्याची ईसीजी काढून हृदयक्रिया बंद पडल्याची ईसीजीची ‘फ्लॅट लाईन’ पेशंटच्या नातेवाईकांना दाखवत व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक ती तपासणी करून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निदान होते. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जमावाने कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरवर बळजबरी करत ‘व्हेंटीलेटर’ सुरू करण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर डॉक्टरने व्हेंटिलेटर चालू केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून, व्हेंटिलेटर वरील लाईन ‘फ्लॅट’ नसल्याचेही दिसत होते. मात्र सदर यंत्र हे ‘ईसीजी मशिन’ नसून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी वापरण्यात येणारे ‘व्हेंटिलेटर मशीन’ आहे. त्यामुळे त्याच्यावर दिसणा-या आलेखीय रेषा या मशीनद्वारे देण्यात येणारा कृत्रिम श्वासोच्छ्वास दर्शविणाऱ्या असून हृदयाशी किंवा रुग्णाच्या श्वासोच्छवासाची संबंधित नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.”

तसचे, “व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या सदर रेषा (लाईन) ही कृत्रिम श्वासोच्छ्वासाची लाईन आहे. ज्याचा कोणत्याही अर्थाने रुग्ण जिवंत आहे, असा अर्थ होत नाही. मात्र, जमावाने अतिशय निर्दयपणे त्या विद्यार्थी महिला डॉक्टरला आक्षेपार्ह व निषेधार्ह भाषेत अर्वाच्च शिव्यांची लाखोली वाहिल्याचे व तिच्या अंगावर धावून गेल्याचेही व्हिडीओ मध्ये दिसत आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणणे, रुग्णसेवेत बाधा आणणे, शिवीगाळ करणे आणि के.ई.एम. रुग्णालयाची हेतुतः बदनामी करणे; या बाबींच्या अनुषंगाने नजीकच्या पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध ‘एफ. आय. आर.’ दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.” असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सदर व्हिडिओ ‘व्हॉट्सअप’, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांवर पसरण्यापूर्वी त्याबाबत शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आणि कोणतीही खातरजमा न करता तो व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरवण्यात आला. अशा प्रकारे दिशाभूल करणारे व्हिडिओ समाजाचे माध्यमांवर प्रसृत केल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अक्षरश: दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच जी गोरगरीब व सामान्य जनता मोठ्या आशेने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारासाठी घेऊन येते, त्यांच्या मनात असलेल्या आशेवर आणि विश्वासावर देखील अशाप्रकारच्या व्हिडिओ मुळे अत्यंत प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेणेही गरजेचे आहे. असेही महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 9:23 am

Web Title: that video is misleading kem msr 87
Next Stories
1 मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीला भाजपाचा पाठिंबा मिळणं दुर्दैवी-संजय राऊत
2 मुंबईत एकाच दिवसात २५ हजार जणांचा शोध!
3 प्रसार माध्यमांवर नियंत्रण हवे!
Just Now!
X