संदीप आचार्य 
मुंबई: खासगी रुग्णालयातील बेडचे वाटप यापुढे फक्त महापालिकेच्याच माध्यामातून केले जाणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेडपैकी एकही बेड यापुढे संबंधित रुग्णालयाला परस्पर देता येणार नाही. असा उद्योग कोणी केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी बुधवारी स्पष्ट केले. याशिवाय पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज आदींच्या दरात समानता आणण्याचे आदेश आयुक्त चहेल यांनी मुंबईतील खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

मुंबईतील ३५ मोठ्या खासगी रुग्णालयात कालपर्यंत पालिकेने वारंवार सांगूनही लक्षण नसलेल्या करोना रुग्णांना दाखल करण्यात येत होते. तसेच काही रुग्णालयांकडून अवाच्यासवा बिलांची आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी बुधवारी ३५ खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व विभाग अधिकाऱ्यांसह २०० संबंधितांची बैठक घेतली. यात यापुढे शासनाने २१ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार ८० टक्के पालिकेकडे असलेल्या राखीव बेडवर करोना रुग्णांची व्यवस्था फक्त महापालिकेच्या माध्यमातून केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले. यापुढे पालिकेच्या ताब्यातील ८० टक्के बेड वर एकाही करोना रुग्णाला खाजगी रुग्णालय परस्पर दाखल करू शकणार नाही, असे आदेश आयुक्त चहेल यांनी दिले. तसेच आयसीयू बेडचे शंभर टक्के नियोजन पालिकाच करेल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

याबाबत ‘लोकसत्ता’ शी बोलताना आयुक्त चहेल म्हणाले, “२४ वॉर्डातील नियंत्रण कक्षच्या माध्यमातूनच केवळ करोना रुग्णांच्या बेडचे नियमन केले जाईल. अगदी एखाद्या मंत्र्यांना जरी खाजगी रुग्णालयात दाखल व्हायचे असेल तरी त्यांना पालिकेच्या नियंत्रण कक्ष मार्फतच व्हावे लागणार आहे. कालपर्यंत खासगी रुग्णालयांना करोना रुग्ण दाखल करण्यास परवानगी दिली होती. मात्र बहुतेक ठिकाणी लक्षणे नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातही बेड अडकल्याचे आढळून आले. लक्षण नसलेले रुग्ण रुग्णालयात दाखल करू नये अशा ‘आयसीएमआर’ ची मार्गदर्शक तत्वे असताना त्याचे उघड उघड उल्लंघन खाजगी रुग्णालयांकडून केले जात असल्याने आता अधिक कडक भूमिका घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार उद्यापासून खासगी रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयात एकही करोना रुग्ण दाखल करता येणार नाही. यापुढे प्रत्येक रुग्णाला पालिकेच्या २४ वॉर्डातील नियंत्रण कक्षच्या माध्यमातून दाखल केले जाईल”, असा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. एखादा करोना रुग्ण परस्पर खाजगी रुग्णालयात गेल्यास तात्काळ त्याची नोंद संबंधित वॉर्डात करून वॉर्डातील नियंत्रण कक्षच्या माध्यातूनच त्याला बेडचे वितरण केले जाईल असे स्पष्ट करून आता याचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आयुक्त चहेल यांनी स्पष्ट केले.

बेडच संपूर्ण नियंत्रणाबरोबच काही रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेल्या मनमानी बिलांबाबत आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना समज दिली. तसेच मुंबई महापालिकेने ४४० रुपये दराने तीन लाख पीपीई किट घेतले असून ४५ रुपये दराने एन -९५ मास्क विकत घेतले आहेत. खासगी रुग्णालयांनाही याच दराने पालिकेचे पुरवठादार पुरवठा करतील त्यामुळे बिलात पीपीइ किट, मास्क व हातमोज्यांसह आवश्यक बाबींचे दर जास्त लावता येणार नाही. तसेच हा पुरवठा सुरु होईपर्यंत सर्व खासगी रुग्णालयांना यासाठी रुग्णांकडून आकरण्यात येणाऱ्या दरात समानता आणावी, असेही आयुक्तांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना सांगितले.

यामुळे ३५ खासगी रुग्णालयातील सुमारे ३००० बेड अधिक वॉर्ड स्तरावरील छोट्या रुग्णालयातील २००० बेड अशा पाच हजार बेडचे वाटप यापुढे थेट पालिकेकडूनच केले जाणार आहे. वॉर्ड स्तरावरही पालिकेने निश्चित केलेल्या रुग्णालयातील एकही बेड परस्पर करोना रुग्णांना देता येणार नाही व यासाठी आवश्यकता वाटल्यास रुग्णालयाबाहेर पोलीस बसविण्यात येईल असेही आयुक्त चहेल यांनी सांगितले.