पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. शहीदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर द्या, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक घडवा अशी मागणी देशभरातून होते आहे. काही वेळापूर्वीच हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचं आवाहन करत पुलवामा येथील भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्या अशी मागणी केली आहे.