२६/११ सारखा हल्ला पुन्हा कधीही होऊ न देणे हीच त्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘सागर कवच’ या योजनेमुळे राज्याचे सागरी किनारे सुरक्षित आहेत. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमांतून आमची शहरांवरही नजर आहे. केंद्राकडूनही मुंबईच्या सुरक्षेसाठी चांगले सहकार्य लाभले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८च्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी नऊ वर्ष पूर्ण झाली. याच दिवसाचे औचित्य साधत ‘२६/११’च्या स्मृतीस्थळी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे दी इंडियन एक्स्प्रेसतर्फे फेसबुकच्या सहयोगाने ‘शक्तीसंकल्पाचा जागर’ (STORIES OF STRENGTH) हा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

याच कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांचीही उपस्थिती होती. २६/११ हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी आणि सैन्यदलाने दाखवलेल्या शौर्याच्या आणि बलिदानाच्या कथा आपल्या स्मरणात कायम राहतील. दहशतवादाविरोधात एकोपा दाखवणे हीच भावना आवश्यक असते असे मत अमिताभ बच्चन यांनी यावेळी मांडले. दहशतवाद हा सत्य-असत्य, चूक-बरोबर ठरवू शकत नाही. बंदुका, बॉम्ब हे आपल्या मुलांचे भविष्य नाही. तसेच दहशतवाद ही विचारधारा असूच शकत नाही असेही अमिताभ यांनी म्हटले आहे. तुकाराम ओंबळेंच्या पोटात कसाब गोळ्या झाडत होता तरीही त्यांनी त्याला सोडले नाही हे त्यांचे शौर्य शब्दात वर्णन करता येण्यासारखे नाही. या सगळ्या स्मृती या कार्यक्रमातून जपल्या म्हणून मी एक्स्प्रेस ग्रुपचेही आभार मानतो असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले.

२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांचे जवानांचे शौर्य कधीही विसरता येणार नाही-अमिताभ बच्चन

२६/११ च्या हल्ल्याच्या जखमा सहन करणारे, तसेच या दुर्घटनेतील पीडित कोणताही द्वेष न बाळगता जगत आहेत ही बाब महत्त्वाची आहे असे मत द इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांनी मांडले. तर शहरे ही जगाचा इतिहास आणि भविष्य असतात म्हणून दहशतवाद्यांसाठी शहरे ही सॉफ्ट टार्गेट असतात असे मत  लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. संपूर्ण जग दहशतवादाशी लढा देऊ शकते, मात्र भारत हा एकच देश असा आहे जो देश ही समस्या सोडवू शकतो. कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाणे ही आपली संस्कृती आहे त्यामुळे दहशतवाद मुळापासून नाहीसा करण्यात भारत यशस्वी होईल असे मत प्रसून जोशी यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी ‘इस बार नहीं’ ही कविताही सादर केली. या कवितेतून त्यांनी २६/११ च्या वेदनांना शब्दरूप दिले.

 

प्रसून जोशी यांनी ‘इस बार नहीं’ ही कविता यावेळी सादर केली

याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाणे म्हटले. तसेच ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनीही कानडा राजा पंढरीचा हे गाणे सादर केले. प्रसून जोशी यांनी सादर केलेल्या कवितेला उपस्थितांची वाहवा मिळाली तर संगीतकार आणि गायक अमित त्रिवेदी यांनी रघुपती राघव राजा राम हे गीत सादर केले. गायिका प्रियांका बर्वे यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे सादर करत शहिदांना आदरांजली वाहिली त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. राष्ट्रगीत सादर होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.