15 February 2019

News Flash

ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलणार

लौघात या जलवाहिनीजवळच वैतरणा आणि अप्पर वैतरणा जलवाहिन्या विसावल्या.

(संग्रहित छायाचित्र)

महापालिकेचा निर्णय;  ३८६ कोटी खर्च अपेक्षित

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्यासाठी तब्बल ३८६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत बाळकुम ते हाजुरी पूल आणि हाजुरी पूल ते सॅडस टनेलपर्यंत विस्तारलेल्या तानसा जलवाहिनी बदलून त्या ठिकाणी तीन हजार मि.मी. व्यासाची नवी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

ब्रिटिशांनी १९२६ मध्ये मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी तानसा ते पवईदरम्यान ६४ कि.मी. लांबीची १८०० मि.मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकल्या होत्या. कालौघात या जलवाहिनीजवळच वैतरणा आणि अप्पर वैतरणा जलवाहिन्या विसावल्या. या जलवाहिन्यांमधून भांडुप जलशुद्घीकरण केंद्रापर्यंत दररोज सुमारे २,१७० दशलक्ष लिटर पाणी वाहून आणण्यात येते. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात आल्यानंतर छोटय़ा-मोठय़ा जलवाहिन्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून मुंबईकरांच्या घराघरात पोहोचविले जाते.

ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी ठिकठिकाणी जीर्ण झाली असून काही वेळा जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत होता. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने २०१४ मध्ये तानसा धरण ते गुंदवली दरम्यानची जुनी तानसा जलवाहिनी बदलली आणि त्या जागी २,७५० मि.मी. व्यासाची नवी जलवाहिनी टाकण्यात आली. तानसा जलवाहिनी अत्यंत जुनी झाली असून अतिदाबाने पाणीपुरवठा केल्यास जलवाहिनी फुटण्याचा धोका आहे. त्यामुळे तानसाच्या दोन्ही जलवाहिन्यांमधून केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. आजघडीला बाळकूम ते भांडुपदरम्यान वैतरणा व अप्पर वैतरणा या दोन जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मुंबईकरांची वाढती तहान भागविण्यासाठी गारगाई व पिंजाळ जलप्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचे पाणी वाहून आणण्यासाठी गुंदवली ते भांडुप संकुलदरम्यान जलबोगदा उभारण्यात आला आहे.

भविष्यात जलबोगद्याची तपासणी, दुरुस्त किंवा आपत्कालीन परिस्थितीत तानसा जलवितरण व्यवस्था बाधित होऊ नये म्हणून जुन्या तानसा जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दोन टप्प्यांत प्रकल्प

हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १८४ कोटी ८८ लाख ४० हजार रुपये खर्च करुन बाळकूम ते हाजुरी पूल दरम्यान ४.५ कि.मी. लांबीची सुमारे ३ हजार मि.मी. व्यासाची, तर दुसऱ्या टप्प्यात २०२ कोटी ३८ लाख २२१ रुपये खर्च करून बाजुरी पूल ते सॅडल टनेलदरम्यान ४.९ कि.मी. लांबीची ३ हजार मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

First Published on August 16, 2018 2:38 am

Web Title: the british rule tansa pipeline will change