नमिता धुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परळच्या आर. एम. भट शाळेत अत्याधुनिक सोयीसुविधा

इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या भाऊगर्दीत मराठी शाळा हरवत चालल्या असताना गिरणगावातील एका मराठी शाळेला आधुनिकतेचा साज चढवण्यासाठी शाळेच्याच माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. परळच्या आर. एम. भट या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सामूहिक वर्गणीतून निधी उभा करत शाळेतील वर्गखोल्यांपासून स्वच्छतागृहापर्यंत आणि शुद्ध पाणीपुरवठय़ापासून सीसीटीव्ही निगराणीपर्यंतच्या अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातून या उपक्रमाला प्रारंभ झाला. शाळेच्या १९४७ सालच्या बॅचपासूनचे साधारण साडेचार हजार माजी विद्यार्थी एकत्र आले. त्या वेळी विद्यार्थिदशेत असताना आपण बाकावर कोरलेली नावे अद्यापही तशीच असलेली पाहून हे माजी विद्यार्थी क्षणभर बालपणीच्या आठवणीत हरवले. पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या लक्षात आले की आपल्या शाळेची ही अवस्था अतिशय वाईट आहे. त्यातून पुढे आला तो ‘गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ’. याअंतर्गत प्रत्येक वर्षांच्या बॅचने एक-एक वर्ग दत्तक घेतला आणि त्याच्या नूतनीकरणाचा खर्च उचलला. या खर्चातून शाळेचे रंगकाम करण्यात आले. आता शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा, प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर या गोष्टी पुरवण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेविषयी ओढ वाटावी यासाठी आकर्षक वर्ग तयार करण्यात आले. शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली. भविष्यात शाळेत क्रीडा अकादमी सुरू करण्यात येणार असून त्यासाठी निधी संकलनाचे काम सुरू असल्याचे शाळेचे माजी विद्यार्थी स्वप्निल पेडणेकर यांनी सांगितले.

शाळेच्या या बदलत्या रूपाचा आजूबाजूच्या परिसरातील पालकांवर सकारात्मक परिणाम होतो आहे. दरवर्षी माध्यमिक विभागासाठी एखाद-दुसरा विद्यार्थी प्रवेश घेत होता. पण या वर्षी एकूण १४७ नवे प्रवेश माध्यमिक विभागासाठी झाले आहेत.

‘आपले बालपण सुसंस्कृत आणि समृद्ध करणारी शाळा अद्ययावत करण्याचे स्वप्न सर्व माजी विद्यार्थ्यांनी पाहिले. शाळेच्या शताब्दीपूर्तीसह आम्हा माजी विद्यार्थ्यांचे स्वप्नही पूर्ण होत आहे,’ असे १९८३च्या बॅचचे शाळेचे माजी विद्यार्थी संजय खानविलकर म्हणाले. येत्या ३ सप्टेंबरला शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आयोजित ‘पुन्हा एकदा शतायुषी’ या शाळेत होणाऱ्या कार्यक्रमात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The change of school from the former students gurudakshine
First published on: 29-08-2018 at 03:38 IST