राज्यात भाजपा – शिवसेनेतील सत्ता स्थापनेचा संघर्ष अगदी टोकाला पोहचला असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून उद्या ‘मातोश्री’ शिवसेनेच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील सत्तेबाबत मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री पद याबाबत शिवसेनेचा उद्या अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.

दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं होणार असे पुन्हा एकादा स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. यानंतर दुपारी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांची भेट घेतली व या भेटीनंतर राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असं स्पष्ट केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी शिवसेनेची बैठक ही सत्ता स्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याबाबत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

दुसरीकडे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असल्याचे, भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी तसे संकेत दिले आहे. “आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत,” अशी माहिती दिली आहे.